बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांतही कलंकित उमेदवार

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 3 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही गुन्हेगारांना तिकिटे देण्याची परंपरा सर्व पक्षांनी तेवढ्याच जोमाने पाळल्याचे दिसून आले आहे. ‘नॅशनल इलेक्‍शन वॉच’ आणि लोकशाही हक्कांसाठीची अभ्याससंस्था-एडीआर यांच्या पाहणीनुसार तिसऱ्या टप्प्यातील ११९५ पैकी ३१ टक्के म्हणजे ३७१ उमेदवारांविरुद्ध गंभीर व त्यातही ४० टक्के म्हणजे २८२ उमेदवारांवर अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनीच प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे.

११९५ पैकी ३७१ जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही गुन्हेगारांना तिकिटे देण्याची परंपरा सर्व पक्षांनी तेवढ्याच जोमाने पाळल्याचे दिसून आले आहे. ‘नॅशनल इलेक्‍शन वॉच’ आणि लोकशाही हक्कांसाठीची अभ्याससंस्था-एडीआर यांच्या पाहणीनुसार तिसऱ्या टप्प्यातील ११९५ पैकी ३१ टक्के म्हणजे ३७१ उमेदवारांविरुद्ध गंभीर व त्यातही ४० टक्के म्हणजे २८२ उमेदवारांवर अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनीच प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्तारुढ भाजप-जदयू व कॉंग्रेस यांच्यासह प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांवर विश्‍वास ठेवला. या टप्प्यात राजद-भाजप-कॉंग्रेस यादीतील तर सुमारे दोन तृतीयांश उमेदवार गुन्हे दाखल असलेले आहेत. भाजप व कॉंग्रेसबाबत तर अशा गुन्हेगारांचे प्रमाण ७६ टक्‍क्‍यांपर्यंत व राजदबाबत ते ७३ टक्‍क्‍यांपर्यंत जाते. या टप्प्यात ९ महिलांना तिकिटे देण्यात आली. एडीआरचे संस्थापक जगदीश चोकर यांनी आज अहवाल सादर करताना सांगितले, की ३१ टक्के उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यातील २४ टक्के उमेदवारांवर खून, बलात्कार व अपहरणासारखे गंभीर गुन्हेही आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारांना तिकिटे देण्याबाबत दिलेल्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. गुन्हेगारांना उमेदवारी देणे याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही चोकर यांनी सांगितले. यंदा गुन्हेगारांना तिकीट देण्यामागील एक वेगळेच कारण मुख्य पक्षांनी शोधून काढले. ते म्हणजे, त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले म्हणून त्यांना तिकिटे दिली. मात्र काम व गुन्हेगारी यांचा तिकीट वाटपाशी कसा संबंध जोडता येतो असा सवाल उपस्थित केला आहे. 

कलंकित उमेदवारांचे प्रमाण (कंसातील आकडे टक्क्यांत)
गंभीर गुन्हे असलेले उमेदवार

 • राजदच्या ४४ पैकी ३२ (७३)
 • भाजपच्या ३४ पैकी २६ (७६) 
 • कॉंग्रेसच्या २५ पैकी १९ (७६) 
 • लोजपाच्या ४२ पैकी १८ (४३) 
 • जदयूच्या ३७ पैकी २१ (५७)
 • बसपाच्या १९ पैकी ५ (२६) 

अतिगंभीर गुन्हे असलेले उमेदवार 

 • राजद -४४ पैकी २२, 
 • भाजप- ३४ पैकी २२
 • कांग्रेस २५ पैकी १४
 • लोजपा ४२ पैकी ११
 • जदयू ३७ पैकी ११
 • बसपा १९ पैकी ४

अन्य गुन्हे दाखल असलेले उमेदवार

 • ५ जणांविरुद्ध बलात्काराचे (कलम ३७६),
 • २० जणांविरुद्ध खून किंवा (कलम ३०२),
 • ७३  जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचे (कलम ३०७) गुन्हे.

कोट्यधीशांचीही वाढती संख्या
११९५ पैकी ३६१ (३० टक्के) उमेदवारांकडे १ कोटी किंवा त्याहून जास्त संपत्ती. 
भाजप : ३४ पैकी ३१(९१टक्के) 
काँग्रेस : २५ पैकी १७(६८ टक्के, प्रत्येकी सरासरी २.५७ कोटी) 
राजद : ४४ पैकी ३५(८० टक्के, सरासरी ४.७९कोटी) 
जदयू : ३७ पैकी ३०(८१ टक्के, सरासरी ३.३१ कोटी) 
लोजप : ४२ पैकी ३१(७४ टक्के, सरासरी ३.१४ कोटी) 
बसप : १९ पैकी १०(५३ टक्के, सरासरी ३.८६ कोटी) 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Vidhansabha Election Criminal Candidate Politics