शेतकऱ्यांच्या बिर्याणीवरुन पोटदुखी; काय खातात पेक्षा काय बोलतात ते महत्त्वाचं नाही का?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

शेतकरी काय खातात यापेक्षा ते काय बोलू इच्छितात हे महत्त्वाचं नाही का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतोय. 

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात अत्यंत जोरदार आंदोलन करत आहेत. हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना आधी दिल्लीतील प्रवेशापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधूर आणि भर थंडीत पाण्याचा फवारा करण्यात आला. तरीही शेतकरी ठाम राहिले. शेतकऱ्यांच्या या दृढ निश्चयापुढे सरकारला नमावं लागलं. मात्र असं असलं तरी काही लोक शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर टीका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांना 'खलिस्तानी' म्हणून काही लोकांकडून हिणवलं गेलं तर आता 'बिर्याणी फार्मर्स' म्हणून त्यांची हेटाळणी केली जातेय. 

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचा व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओनुसार आंदोलनातील गाझीपूर येथील शेतकऱ्यांना खायला बिर्यानी दिली जात आहे. त्यावर “Biryani time at Ghazipur farmers protest spot” असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडीओनंतर आता आंदोलकांबाबत प्रश्न उभे केले जात आहेत. त्यांना थेट कट्टर इस्लामिक लोकांचा पाठिंबा असल्याची टीका काही नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ही बदनामी भाजपच्या आयटी सेलकडून करण्यात येत असल्याचं अनेकांनी म्हटलंय. 

बिर्याणीवरुन या आंदोलनाची तुलनाही शाहिनबाग आंदोलनाशी केली गेली. या टीकाकारांच्या म्हणण्यानुसार सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात गेल्या डिसेंबर महिन्यात सुरु झालेले शाहिनबाग आंदोलन हे मुस्लिम, देशद्रोही आणि डाव्या चळवळींकडून चालवलं गेलं होतं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची तुलना देखील या शाहिनबाग आंदोलनाशी केली जातेय. हा शाहिनबागचा दुसरा भाग असल्याचं काहींनी म्हटलंय तर एकाने म्हटलंय की बिर्याणी हा नव्या युगातील आंदोलकांचा मुख्य आहारच  बनला आहे. या कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनामागेही तेच कट्टर मुस्लिम, डावे, काँग्रेस आणि आप पक्षाचे लोक आहेत ज्यांनी शाहिनबागच्या आंदोलनाला फूस लावली. या प्रकारच्या टीका ट्विटरवर या शेतकरी आंदोलनावर करण्यात आल्या. 

मात्र, शेतकऱ्यांनी बिर्यांनी खाल्ली तर बिघडलं कुठे? बिर्याणी खाणे हा देशद्रोह आहे का? असा सवालही अनेकांनी उपस्थित करत या मानसिकतेचा निषेध केला. तसेच ही बिर्याणी नसून पुलाव असल्याचाही दावा अनेकांनी केला. बदनामीची ही मोहीम हेतुपूर्वक भाजपाच्या आयटी सेलकडून चालवण्यात येत असून लोकांची दिशाभूल करण्यासाठी याचा वापर केला जात असल्यांचं अनेकांनी म्हटलंय. सरकारविरोधात उठणाऱ्या सगळ्या आवाजांना याप्रकारे देशद्रोहाचा रंग देऊन बदनाम करण्याचं षड्यंत्र राबवलं जात असल्याचंही अनेकांनी म्हटलंय. सरकारने आधी विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि आता ते शेतकऱ्यांना चिरडत आहे, अशी टीकाही अनेकांनी केली. शेतकरी काय खातात यापेक्षा ते काय बोलू इच्छितात हे महत्त्वाचं नाही का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biryani served in farmers protest controversy over biryani some said shaheen bagh 2 is returned