भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा मोदी आज घेणार 'वर्ग'

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 एप्रिल 2017

'जीएसटी', राष्ट्रपती निवडणुकीबाबत मार्गदर्शन होणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. 23) भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दिल्लीत खलबते करणार आहेत. आगामी "जीएसटी' कायद्याची अंमलबजावणी, राष्ट्रपतिपदाची निवडणूक, तसेच गरीब कल्याण योजनांची प्रगती याबाबत मोदी स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांचा "क्‍लास' घेतील. महाराष्ट्रासह काही राज्यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली यानिमित्ताने पुढे सरकू शकतात. या बैठकीत भाजपचे 13 मुख्यमंत्री व पाच उपमुख्यमंत्री सहभागी होतील, असे पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी आज सांगितले.

राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीसाठी विरोधकांनी मोदींच्या विरोधात एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच, सत्तारूढ भाजपनेही तयारीला जोरदार प्रारंभ केल्याचे हे द्योतक मानले जात आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी; 7, लोककल्याण मार्ग येथे होणाऱ्या उद्याच्या बैठकीत अमित शहाही संबोधित करतील. मागील वर्षी महाराष्ट्र सदनात झालेल्या अशाच बैठकीत मोदींनी गरीब कल्याण योजनांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. मात्र, भाजपच्या काही राज्यांत त्याबाबत समाधानकारक प्रगती होत नसल्याचे "पीएमओ'च्या निदर्शनास आल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. यात प्रशासनाकडून काही अडचणी वा अडथळे येत आहेत का व त्यांना तोंड देऊन पुढे कसे जायचे, याबाबत भाजप मुख्यमंत्र्यांना उद्या काही मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे.

"जीएसटी'शी संबंधित चार वित्त विधेयके लोकसभेत नुकतीच एका फटक्‍यात मंजूर झाल्याने एक जुलैपासून देशभरात ही नवी व ऐतिहासिक अप्रत्यक्ष करप्रणाली लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यादृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना करण्यासाठी ही मुख्यमंत्री बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रपती निवडणूक महत्त्वाची
भाजपच्या दृष्टीने सध्या सर्वांत महत्त्वाचा दुसरा विषय आगामी राष्ट्रपतिपदाची निवडणूक हा आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै 2017 रोजी, तर उपराष्ट्रपती महंमद हामीद अन्सारींचा कार्यकाळ दहा ऑगस्ट 2017 रोजी संपुष्टात येईल. प्रथम नव्या राष्ट्रपतींची निवड होईल. भारताच्या प्रथम नागरिकाची ही निवडणूक जिंकणे भाजपसाठी कमालीच्या प्रतिष्ठेचे राहणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यनिहाय प्रत्येक खासदार, आमदाराच्या मताचे मूल्य असते. यातील एकूण दहा लाख 98 हजार 882 मूल्याच्या मतांपैकी एकट्या उत्तर प्रदेशातून 83 हजार 824 मते येतात. साहजिकच तेथील विजयानंतर भाजपला मोठा दिलासा मिळाला असला, तरी पूर्ण निःश्‍वास टाकावा अशी परिस्थिती अजूनही नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp chief minister and narendra modi