भ्रष्टाचाराला हौताम्याचा रंग देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न- भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

आयएनएक्‍स' घोटाळ्यातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचा दावा सत्तारूढ पक्षाने केला आहे. 

नवी दिल्ली ः आयएनएक्‍स' घोटाळ्यातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचा दावा सत्तारूढ पक्षाने केला आहे. अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला "हुतात्मा' ठरविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न निंदनीय असल्याचा पलटवारही भाजपने केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही असा इशारा देऊन भाजपने जणू "रांगेत मागे बरेच जण आहेत,' असेही सूचित केले आहे. 

चिदंबरम यांची जमानत याचिका दिल्ली न्यायालयाने फाटाळली. त्यानंतर तब्बल 27 तास "अदृश्‍यावस्थेत' असलेले चिदंबरम यांना सीबीआयने काल रात्री दहाच्या सुमाराला जोरबाग भागातील त्यांच्या आलिशान घरातून नाट्यमयरीत्या अटक केली. त्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेला धिंगाणा, तपास अधिकाऱ्यांना कुंपणाची भिंत ओलांडून व आत उड्या मारून प्रवेश करावा लागणे, कार्यकर्त्यांचा गोंधळ त्यांच्याच घराच्या बाल्कनीतून सुहास्यवदनाने पहात असलेले कॉंग्रेस नेते या साऱ्या घटनाक्रमावर दिल्लीत जोरदार चर्चा आहे.

भाजपने मात्र या साऱ्या कारवाईशी सरकारचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की कायदा त्याचे काम करत आहे. न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. यात भाजप किंवा सरकारचा काहीही सहभाग नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना कोठे ठेवायचे हे सरकार नव्हे तर न्यायालय ठरवते. याच्याशी सरकारचे काही देणे घेणे नाही. 

दुसरीकडे चिदंबरम यांच्या बचावासाठी एकजूट झाल्याचे दाखवून पुढे आलेल्या कॉंग्रेसवरही भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भ्रष्टाचाराला क्रांतीचे रूप देण्याचा प्रयत्न देश प्रथमच पहात असल्याची टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यातील एकही जण आता कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही असाही गर्भित इशारा त्यांनी दिला. एका भ्रष्टाचाराला "शहादत' ठरविण्याचा निंद्य प्रयत्न कॉंग्रेसकडून होत आहे व हा पक्ष कोणाच्या मागे उभा रहातो हेही देश कालपासून पहात आहे असे भाजप नेते शांतप्रकाश जाटव यांनी सांगितले. नक्वी म्हणाले की अर्थव्यवस्थेसमोरील कथित संकटासारखे मुद्दे हाताळण्यास मोदी सरकार समर्थ आहे. त्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईच करू नका, असे म्हणणे गैर आहे. सारा कॉंग्रेस पक्षच सध्या नकारात्मक मानसिकतेत असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Criticise Congress says congress wants to save chidambaram