esakal | भाजपने वर्षभरात पाच मुख्यमंत्री बदलले; झारखंड निवडणुकीतून घेतला धडा?
sakal

बोलून बातमी शोधा

Modi, Shah

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे नेतृत्व कोणाच्या हातात देणार हे लवकरच समजेल. भाजपचे दिल्लीतील नेते गुजरातमध्ये पोहोचले असून त्यांची बैठक सुरु आहे.

भाजपने वर्षभरात पाच मुख्यमंत्री बदलले; झारखंड निवडणुकीतून घेतला धडा?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भाजप नेते विजय रुपानी यांनी शनिवारी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढच्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने गेल्या दोन महिन्यात तीन राज्यात मुख्यमंत्री बदलले आहेत. झारखंडमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपने आता कोणताही धोका न पत्करण्याच्या दृष्टीने असे निर्णय घेतले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच ज्या मुख्यमंत्र्यांचे काम अपेक्षित असं झालेलं नाही किंवा ज्यांच्याबद्दल जनतेत, नेत्यांमध्ये रोष आहे अशांना नारळ दिला जात आहे.

केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता तर मिळाली. पण त्यानंतर सहा महिन्यांनी झारखंडमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. राज्यात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपचा पराभव केला. याला तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास यांना जबाबदार ठरवण्यात आलं होतं. झारखंडच्या पराभवातून धडा घेऊन भाजपने एका वर्षात पाच मुख्यमंत्री बदलले. यामध्ये नुकतंच गुजरातमध्ये विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे.

हरयाणात २०१९ मध्ये निवडणूक झाली होती. तेव्हा भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तेव्हा आघाडी करून सरकार स्थापन केलं पण भाजपने मनोहर लाल खट्टर यांनाच मुख्यमंत्री पदी कायम ठेवलं. झारखंडमधील पराभव आणि हरियाणातील चुकांमुळे आता भाजप लोकप्रियता ढासळलेल्या मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी का दिला राजीनामा? ही असू शकतात कारणं

भाजपने सुरुवात उत्तराखंडपासून केली होती. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र रावत यांच्यानंतर तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री केलं. मात्र त्यांनाही पद सोडावं लागलं. आता त्यांच्या जागी पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिंमत बिस्वा सरमा यांच्याकडे जबाबदारी दिली. तर कर्नाटकात येडियुरप्पांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आले. एवढंच नाही तर असंही म्हटलं जात आहे की, आता भाजप येडियुरप्पा यांच्याशिवाय २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे.

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे नेतृत्व कोणाच्या हातात देणार हे लवकरच समजेल. भाजपचे दिल्लीतील नेते गुजरातमध्ये पोहोचले असून त्यांची बैठक सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यासह इतर नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. आता कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.

loading image
go to top