
BJP : बिहारच्या मजुरांची तामिळनाडूत हत्या झाल्याची पसरवली अफवा; भाजप प्रवक्त्याविरोधात तक्रार
नवी दिल्ली - तामिळनाडूत बिहारमधील स्थलांतरित मजुरांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वृत्तपत्राचे संपादक आणि एका स्थानिक दैनिकाच्या मालकाचे नावही तामिळनाडू सरकारने आरोपी म्हणून निश्चित केलं आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भाजपचे उत्तर प्रदेश प्रवक्ते प्रशांत उमराव यांनी ट्विट केले होते की, 'तामिळनाडूत हिंदी बोलल्यामुळे बिहारमधील १२ स्थलांतरितांची हत्या करण्यात आली. मात्र आता हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे.
प्रशांत उमराव यांनी भाषेच्या आधारे लोकांमध्ये वैमनस्य निर्माण केल्याचा आरोप तामिळनाडू पोलिसांनी केला आहे. दैनिक भास्करचे संपादक आणि तनवीर पोस्टचे मालक यांच्याविरोधात वैमनस्य पसरवल्याप्रकरणी आणि दंगल भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण भारतात बिहारमधील स्थलांतरित मजुरांवर झालेल्या हल्ल्यांबाबत गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपवर अनेक फेक मेसेज शेअर करण्यात आले होते. तामिळनाडू आणि बिहारमधील राज्य सरकारने अशा मेसेजविरोधात इशारा दिला होता.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, स्थलांतरित मजुरांनी घाबरण्याचे कारण नाही. जर कोणी आपल्याला धमकी देत असेल तर हेल्पलाईनवर कॉल करा. तामिळनाडूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थलांतरित मजुरांना घाबरू नका, असे आवाहन हिंदीत केले आहे. सोशल मीडियावरही पोलिसांची बारीक नजर आहे.