'शेतकऱ्यांचा अपमान सहन होत नाही'; अनेक भाजप नेते राजीनाम्याच्या तयारीत!

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 30 January 2021

26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले

नवी दिल्ली- 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले. अनेक नेत्यांवर हिंसाचाराप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकरी नेत्यांवर दबाव वाढला आहे, असे असताना संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना माघार न घेण्यास राजी केलं. दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकरी जमू लागले आहेत. त्यातच आता नरेश टिकैत यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

अनेक भाजप नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मला अनेक भाजप नेत्यांचे फोन आले. त्यांचे म्हणणं आहे की त्यांना राजीनामा द्यायचा आहे. पक्षामध्ये राहून असा शेतकऱ्यांचा अपमान आम्हाला सहन होत नाही. आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीही माफ करणार नाही, असं नरेश टिकैत म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

टिकैत यांनी शनिवारी ट्विट करत शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर जमा होत असल्याचं म्हटलं आहे. अनेक गावांमधून लोक ट्रॅक्टरने दिल्लीत येत आहेत. गाझीपुर सीमेवर पूर्वीपेक्षा जास्त शेतकरी जमले असल्याचं म्हटलं आहे. गाझीपूर बॉर्डवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आंदोलन कमकुवत होईल असं वाटतं असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही जितकं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, तितकेच आमचे आंदोलन मोठे होईल, असं 
टिकेत म्हणाले आहेत. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर शेतकरी नेत्यांवर केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळलं जावं, म्हणून सरकार हरतर्हेने प्रयत्न करताना दिसत आहे. गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना आंदोलन स्थळ रिकामं करण्यासाठी नोटीस देखील प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. मात्र, काहीही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी दाखवून दिला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader resign farmer protest farm law rakesh tikait