#ShamelessSmriti : तुमचा 'आय क्यू' चेक करा; स्मृती इराणींना नेटकऱ्यांनी सुनावले!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

राहुल गांधी यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता. या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

झारखंडमध्ये एका जाहीर सभेप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बलात्काराच्या घटनांबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा लोकसभेत चर्चेचा विषय ठरला.

सध्या देशात 'रेप इन इंडिया' असंच चित्र दिसत आहे, असे राहुल यांनी या भाषणावेळी म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या लोकेश चॅटर्जी यांनी राहुल यांना या मुद्द्यावरून लक्ष्य बनवले. 

मात्र, त्यानंतर राहुल यांनी 'रेप इन इंडिया' म्हणत भारतातील महिलांवर बलात्कार करण्याचं निमंत्रण दिलं. राहुल यांचा जनतेला हा संदेश आहे का? असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केल्याने त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यानंतर #ShamelessSmriti आणि #YoSmritiSoDumb हे ट्रेंड ट्विटरवर सुरू झाले.  

उन्नाव आणि कथुआ येथील बलात्कार प्रकरणावर इराणींनी चकार शब्द उच्चारला नाही. या दोन्ही बलात्कार प्रकरणात भाजप नेत्यांवर दोषारोप करण्यात आले असल्यामुळे कदाचित इराणींनी याविषयी बोलणं टाळलं. मात्र, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर स्मृती इराणींनी जोरदार विरोध दर्शविला.

राहुल गांधी यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता. या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या भाषणाचा दाखला नेटिझन्स स्मृती इराणींनी देत आहेत.  

तर काही नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, नागरिक सुधारणा विधेयक (सीएबी) वरून ईशान्य भारत पेटला असताना संपूर्ण देशाचे लक्ष्य यावरून हटविण्यासाठी स्मृती इराणींनी पब्लिसिटी स्टंट केला आहे.

काँग्रेस महिला अत्याचाराचे राजकारण करत आहे. मात्र, भारतातील सर्व स्त्रिया राहुल गांधींना जशास तशे उत्तर देतील, असे इराणींनी म्हटले आहे.  

एम. जे. अकबर, कुलदीप सेनगर, चिन्मयानंद या भाजप नेत्यांवर लैंगिक शोषण आणि महिला अत्याचाराचे आरोप आहेत. मात्र, या बाबत स्मृती इराणी यांनी कधीही कोणती प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे 'आपला तो बाळा अन् दुसऱ्याचं ते कारटं' अशी भूमिका इराणी घेत आहेत. त्यामुळे त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Smriti Irani trolled by netizens on twitter