उत्तर प्रदेशात भरदिवसा हत्या; भाजप आमदार म्हणाले आरोपीने आत्मरक्षण केले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

रेशन दुकांनांच्या वाटपासंबंधीची एक बैठक सुरु असताना उत्तर प्रदेशतील बलिया येथे हा वाद झाला. या वादाची परिणीती अंतिमत: गोळी झाडून हत्या करण्यात झाली.

बलिया : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडलीय. एका बैठकीत झालेल्या वादाची अंतिम परिणीती गोळीबारात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि आता या प्रकरणाला राजकारणाचा रंग दिला जातोय. यातील आरोपीचे समर्थन स्थानिक भाजपा आमदार करताना दिसतायत. त्यांनी एक वक्तव्य जाहीर केलंय ज्यात ते आरोपीची बाजू घेताना दिसतायत. आरोपीचीही बाजू ऐकून घेतली  पाहीजे, असं त्यांनी म्हटलंय. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिलंय. 

काय आहे घटना?
पोलिसांनी याबाबत माहिती दिलीय की, रेशन दुकांनांच्या वाटपासंबंधीची एक बैठक सुरु असताना उत्तर प्रदेशतील बलिया येथे हा वाद झाला. या वादात शिवीगाळ, दगडफेक आणि मारहाण झाली. या वादाची परिणीती अंतिमत: गोळी झाडून हत्या करण्यात झाली. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाच सेकंदाच्या या व्हिडीओत तीन वेळा गोळीबार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच गोळीबारानंतर लोक घाबरुन पळताना दिसत आहेत.

भाजपा आमदाराचे आरोपीला समर्थन
मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. या व्हिडीओत ते आरोपीची बाजू घेताना दिसतायत. आरोपीचे नाव धीरेंद्र सिंह असे आहे. आमदारांनी म्हटलंय की आत्मरक्षेसाठी आरोपीने गोळी चालवली नसती तर त्याच्यासहीत त्याच्या घरातील सगळे लोक मारले जाते. तेही खूपच जखमी आहेत, त्यांचीही बाजू ऐकली पाहीजे. माझे बैरियाची जनता आणि प्रशासनाला एकच सांगणं आहे की या घटनेची निंदाच करायला हवी मात्र न्याय केला पाहीजे. ज्याने ज्या प्रमाणात चूक केलीय त्याला त्या प्रमाणात शिक्षा मिळायला हवी. जर एखाद्याने गोळी मारली असेल तर त्याला शिक्षा व्हावी मात्र ज्यांनी काठीने सहा-सहा लोकांना मारून जबर जखमी केलंय त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे. माझी प्रशासनाला हीच मागणी आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
आरोपी धीरेंद्र सिंह हा भाजपाचे आमदार असलेल्या सुरेंद्र सिंह यांचा निकटवर्तीय आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून घटनेवेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश त्यांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader surendra singh supported accused dhirendra singh in ballia