esakal | दुकान बंद करुन घरी जात असलेल्या भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

attack.jpg

ते पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करुन परतले होते. त्यानंतर काही वेळ बसून दुकान बंद करुन जाताना दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 

दुकान बंद करुन घरी जात असलेल्या भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फिरोजाबाद- दुकान बंद करुन घरी जात असलेल्या एका 42 वर्षीय भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे घडली. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी भाजप नेत्यावर गोळ्या झाडल्या. दयाशंकर गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भाजपचे मंडल उपाध्यक्ष होते. घटनेनंतर संतप्त व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ही घटना शुक्रवारी (दि.16) रात्री घडली. घटनास्थळी पोलिस अधीक्षकांसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

दयाशंकर गुप्ता हे शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास दुकांन बंद करत होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी गुप्ता यांच्या छातीत घुसली. गोळी लागताच गुप्ता हे जमिनीवर पडले. त्यावेळी हल्लेखोर तेथून पसार झाले. गोळ्यांचा आवाज येताच घटनास्थळी परिसरातील नागरिक जमा झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुप्ता यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

त्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस अधीक्षक मुकेशचंद्र मिश्रा यांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची समजूत काढली आणि रस्ता मोकळा केला. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्ता हे पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करुन परतले होते. त्यानंतर काही वेळ बसून दुकान बंद करुन जाताना दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.