मोदी, नड्डा यांनी माफी मागावी : काँग्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi-and-JP-Nadda

मोदी, नड्डा यांनी माफी मागावी : काँग्रेस

नवी दिल्ली : भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी असभ्य भाषा वापरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी नड्डा यांना एक पत्र पाठविले आहे. शनिवारी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका कार्यक्रमात शुक्ला यांनी सोनिया यांना उद्देशून शिवीगाळही केली. याचा निषेध करून रमेश यांनी अशा अनुदार उद्गारांची पुनरावृत्ती झाल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला.रमेश यांनी म्हटले की, भाजपचे प्रमुख नेते आणि प्रवक्ते संस्कृतीच्या गप्पा मारतात, पण एका राष्ट्रीय पक्षाच्या ७५ वर्षांच्या अध्यक्षांबद्दल आणि ते सुद्धा महिलेविषयी वारंवार आक्षेपार्ह भाषा वापरतात. यावरून भाजपची महिलांच्या विरोधातील विचारसरणी उघड होते. अशा वक्तव्यांमुळे देशातील राजकारणाचा दर्जा खाली गेला आहे. भाजपच्या नेते तसेच प्रवक्त्यांनी राजकारणाच्या दर्जाला धक्का लावू नये, असे आवाहनही रमेश यांनी केले.

सोनियांच्या चौकशीमुळे काँग्रेसचा उद्या सत्याग्रह

काँ ग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर होतील त्यादिवशी सत्याग्रह करण्यात येईल असे काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सोनिया यांना चौकशीसाठी पुन्हा पाचारण केले आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सर्व प्रदेश शाखांना पत्राद्वारे आदेश दिला आहे. राज्याच्या राजधानीच्या शहरात जेथे महात्मा गांधी यांचा पुतळा असेल तेथे किंवा कोणत्याही ऐतिहासिक स्मारकापाशी सकाळी दहा वाजल्यापासून शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करावीत, असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांची अनेकदा चौकशी झाली. त्यावेळी देशातील विविध ठिकाणी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले होते.

वैदिक काळापासून महिलांचा आदर ही भारताची महान परंपरा राहिली आहे. त्यामुळे भाजपच्या बाबतीत राजकारणात सभ्यता आणि महिलांविषयी आदरपूर्वक वर्तन या स्वाभाविक अपेक्षा ठरतात, पण सत्ताधारी पक्षाने या आघाडीवर वारंवार निराशा केली आहे.

- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस

Web Title: Bjp Prem Shukla Narendra Modi Jp Nadda Should Apologize Congress Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..