विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ठरला रोडमॅप

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबतही या वेळी बोलणी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळतानाच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली. 

महाराष्ट्रासोबतच हरियाना आणि झारखंड विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लगेचच होणाऱ्या या विधानसभा निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असतील. साहजिकच या राज्यांमध्ये यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या राज्यांमधील कोअर ग्रुपच्या नेत्यांसमवेत शहा यांनी बैठक घेतली.

संघटना सरचिटणीस रामलाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, त्याचप्रमाणे हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मंत्री अनिल वीज हेदेखील बैठकीत सहभागी झाले होते. हरियानाचे माजी केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यासह येथील प्रदेशाध्यक्ष आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशातही नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड अपेक्षित आहे. तर, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शहा गृहमंत्री झाल्यामुळे भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचीही नियुक्ती संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक बदलांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरविण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबतही या वेळी बोलणी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळतानाच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP preparing on assembly elections in Maharashtra