'सीआरपीएफ'मुळेच काल वाचलो; ममतांमुळेच हिंसाचार : अमित शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळणार
सातव्या टप्प्यातील मतदान तोंडावर असून, आम्हाला विश्वास आहे की आम्ही 300 पेक्षा अधिक जागा मिळतील. 23 तारखेपर्यंत ममतांनी वाट पाहावी, तुमचे दिवस संपले आहेत. तुम्ही आमच्यावर एफआयआर दाखल करून काही होणार नाही. 

नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: 'राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना 'रोड शो' अर्धवट सोडून पोलिस संरक्षणात तेथून बाहेर पडावे लागले. आज (बुधवार) पत्रकार परिषद घेत त्यांनी ममतांना लक्ष्य केले. 

अमित शहा म्हणाले, की पराभव दिसत असल्यानेच ममता बॅनर्जी यांचा जळफळाट होत आहे. तृणमुलकडून आतापर्यंत तीन हल्ले करण्यात आले. विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून हे कृत्य करण्यात आले. हल्ल्याच्यावेळी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही. सीआरपीएफच्या संरक्षणात मला बाहेर पडावे लागले. पंडीत विद्यासागर यांची प्रतिमा आम्ही तोडल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. मतांच्या राजकारणासाठी पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तृणमुलच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा पुतळा तोडला. या हल्ल्यावेळी तृणमुलची उलटगणती सुरु झाली आहे. निवडणूक आयोग मूक भूमिका घेऊन बसले आहे. बंगालमध्ये निवडणूक आयोग काहीच कार्यवाही का करत नाही. निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. तृणमुलच्या गुंड कार्यकर्त्यांना अटक का केली नाही.  

भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळणार
सातव्या टप्प्यातील मतदान तोंडावर असून, आम्हाला विश्वास आहे की आम्ही 300 पेक्षा अधिक जागा मिळतील. 23 तारखेपर्यंत ममतांनी वाट पाहावी, तुमचे दिवस संपले आहेत. तुम्ही आमच्यावर एफआयआर दाखल करून काही होणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president Amit Shah blames Mamata Banerjee for violence in Kolkata