esakal | प. बंगालमधील हिंसाचारप्रकरणी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव

बोलून बातमी शोधा

supreme-court
प. बंगालमधील हिंसाचारप्रकरणी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा (West Bengal assembly election 2021) निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजपने (BJP) मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme court) धाव घेतली. भाजप प्रवक्ते आणि वरिष्ठ वकील गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर होत असलेला हिंसाचार, हत्या आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआयकडून चौकशीची (CBI Probe) मागणी केली आहे.

अॅड. भाटिया यांनी याचिकेत आरोप केला की, "ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे सदस्य अशा लोकांना निशाणा बनवत आहेत ज्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मत दिलं होतं." दरम्यान, कोलकात्यात अभिजीत सरकार यांच्या झालेल्या हत्येचा उल्लेख करत भाटिया म्हणाले, "ही घटना याचं प्रतिक आहे की, टीएमसीच्या छत्रछायेखाली पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा नंगा नाच सुरु आहे."

मृत्यूपूर्वी अभिजीत सरकार यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका व्हिडिओत म्हटलंय की, "कशाप्रकारे टीएमसीच्या समर्थकांनी त्यांचं घर आणि एनजीओ उद्ध्वस्त करुन टाकली तसेच लोकांना मारहाणही केली. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अभिजीत यांचा मृत्यू झाला, असंही या याचिकेत म्हटलं आहे.

हिंसाचार घडवणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर FIR का नाही?

सीबीआय चौकशीशिवाय पश्चिम बंगाल सरकारला या घटनांबाबत दाखल एफआयआर आणि या घटनांमध्ये सामिल लोकांच्या अटकेसंबंधी स्टेट्स रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. भाटिया यांनी आरोप केलाय की, "तृणमूलचा पोलीस आणि इतर एजन्सीजवर इतका दबाव आहे की, आत्तापर्यंत याप्रकरणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आलेला नाही."