दक्षिण कोरियात पाक समर्थकांना एकट्याच भिडल्या शाझिया इल्मी

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द आणि राज्य फोडण्यावरून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. इंग्लंडमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समर्थकांमध्ये रंगलेल्या घोषणायुद्धावर याचे पडसाद उमटले आहेत.

जम्मू : जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द आणि राज्य फोडण्यावरून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. इंग्लंडमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समर्थकांमध्ये रंगलेल्या घोषणायुद्धावर याचे पडसाद उमटले आहेत. दक्षिण कोरियाला गेलेल्या भाजप आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनाही पाकिस्तानी समर्थकांच्या घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. त्यावेळी भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी या पाक समर्थकांना एकट्याच भिडल्या. 

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देत असलेल्या कलम 370 मधील तरतूदी रद्द केले. तसेच या राज्याचे विभाजन करत केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने भारताच्या उच्चायुक्तांना परत पाठवत रेल्वेसेवा, बससेवा बंद केली. तसेच भारतासोबतचा व्यापारही बंद करून टाकला.

यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्याचा भरपूर प्रयत्न केला. अगदी काल यूएनमध्येही पाकिस्तानने चीनच्या मदतीने भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नसल्याने आज सकाळपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. भारताने चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानची राजौरा सेक्टरमधील चौकी उद्ध्वस्त केली आहे.

दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसह दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये गेल्या होत्या. यावेळी पाकिस्तानी समर्थकांनी भारताविरोधात निदर्शने सुरू केली होती. यावेळी पाकिस्तानी समर्थकांनी 'मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', अशा घोषणा देण्यास सुरवात केली.

यावेळी तेथून जात असलेल्या शाझिया इल्मी आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही भारतातून आल्याचे सांगत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आरएसएस आणि इल्मी यांना त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी इल्मी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत 'भारत झिंदाबाद', 'पाकिस्तान मुर्दाबाद'चे नारे लगावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs Shazia Ilmi Aggressive on Pak Supporters in South Korea