लग्नाची तयारी होऊनही नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही, मग नवरीनं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

लग्नाची तयारी होऊनही नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही, मग नवरीनं...

नवी दिल्ली : लग्नाची तारीख ठरली. मोजक्या लोकांमध्ये लग्न करायचं ठरलं. पण, ऐन लग्नाच्या दिवशी नवरा मुलगाच मंडपात पोहोचला नाही. त्याला फोन करून देखील त्याने कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नवरीने थेट त्याचे घर गाठले आणि त्याच्या घरासमोर धरणे आंदोलन केले. ओडिशामधील बेहरामपूर (behrampur odishad) येथे ही घटना घडली.

हेही वाचा: २१ दिवसांचा संसार पाण्यात बुडाला, नवदाम्पत्याला एकाच सरणावर निरोप

डिम्पल दास असे या तरुणीचे नाव असून तिचे सुमित साहू या तरुणासोबत लग्न ठरले होते. त्यांचा काही दिवसांपूर्वी नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता. त्यानंतर मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत हिंदू रितीरिवाजांद्वारे विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. सोमवारी हा विवाह पार पडणार होता. पण, डिम्पल आणि तिचे कुटुंबीय लग्नमंडपात पोहोचल्यानंतर तिथे लग्नाची कुठलीही तयारी दिसली नाही. तसेच वर आणि त्याचे कुटुंबीय त्याठिकाणी उपस्थित नव्हते. तिने काही तास वाट पाहिली तसेच त्याला अनेकवेळा फोन देखील केला. मात्र, वराच्या कुटुंबीयांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मंडपात वाट पाहण्याऐवजी त्यांनी थेट वराचे घर गाठले आणि त्याठिकाणी धरणे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ''याच जोडप्याबाबत यापूर्वीही महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एफआयआरमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे. नंतर वराच्या कुटुंबानेही वधूच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले'', असे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितेल.

काही महिन्यांपूर्वी झाले नोंदणी पद्धतीनं लग्न -

''आमचे लग्न 7 सप्टेंबर 2020 रोजी नोंदणीकृत झाले. माझे सासरचे लोक पहिल्या दिवसापासून माझा छळ करत आहेत, त्यांनी मला एकदा वरच्या खोलीत बंद करून ठेवले होते. पूर्वी माझ्या पतीने मला पाठिंबा दिला. पण काही दिवसानंतर त्याने आपल्या कुटुंबाची बाजू घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर माझे सासरे माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की आपण सर्व कटुता सोडून हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न समारंभ करूया. लग्नासाठी 22 नोव्हेंबर निश्चित करण्यात आला होती. पण, ते लग्नमंडपात पोहोचले नाहीत. त्यांनी माझी परत एकदा फसवणूक केली. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी धरणे आंदोलन केले'', असं डिम्पलनं सांगितलं.

'माझ्या मुलीचे लैंगिक शोषण केले' -

''सुमीतने माझ्या मुलीचे अनेक दिवस लैंगिक शोषण केले आणि आता तो लग्नालाही आला नाही. माझी मुलगी वापरून फेकण्यासाठी एखादी वस्तू नाही'', असा आरोप तिच्या आईने केला आहे. दरम्यान, वराच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

loading image
go to top