Budget Session : संसद कामकाज गोंधळातून गोंधळाकडेच जाण्याची चिन्हे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

budget session parliament proceedings sensational Hindenburg leaks Adani conglomerate

Budget Session : संसद कामकाज गोंधळातून गोंधळाकडेच जाण्याची चिन्हे !

नवी दिल्ली - अदानी उद्योगसमूहाबाबत ‘हिंडेनबर्ग'ने केलेल्या कमालीच्या खळबळजनक गौप्यस्फोटांनंतर विरोधी पक्षांनी संसदेत चर्चेची मागणी जोरदारपणे लावून धरल्याने आजचा सलग दुसरा कामकाजी दिवस गोंदळामुळे पाण्यात गेला.

यावेळेस एकजूट विरोधकांच्या हाती अदानींचा मुद्दा लागल्याने गदारोळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सत्तारूढ गोटात व्यक्त होत आहे.जर गदारोळच होणार असेल तर अधिवेशन किती दिवस चालवायचे असाही मतप्रवाह असून १४ फेब्रुवारीएवजी ता. ७ ते १० फेब्रुवारीच्या दरम्यान कधीही अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पूर्वरंग गुंडाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान राज्यसभाध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज दुपारी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करताना, ‘जनतेचा पैसा (संसदेतील गोंधळामुळे) असा उधळला जात आहे व (तसे करणारे) आम्ही आहोत, अशी टिप्पणी केल्यानंतर तर राज्यसभेत महाप्रचंड गदारोळ झाला.

अर्थसंकल्पी अधिवेशन ३१ जानेवारीला सुरू झाले व १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रथेनुसार लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर उरलेल्या दोन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार दर्शक प्रस्तावावर चर्चा होणार होती.

मात्र अदानी उद्योगाबाबत संसदेत चर्चा करा या मागणीसाठी झालेल्या गदारोळात सभागृहांचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले व हा आठवडा कामकाजाविनाच गेला. सोमवारपासून (ता.६) अधिवेशनाच्या दुसऱया आठवड्याचे कामकाज सुरू होत आहे. विरोधकांची एकजूट व एकूण अविर्भाव पहाता पुढील आठवड्यात विशेषतः राज्यसभेत कामकाज कितपत चालेल याबद्दल शंका व्यक्त होत आहे. काही भाजप खासदारांच्या मते सोमवारपासून किमान दिवसाच्या उत्तरार्धात अभिभाषणावरील चर्चेसाठी तरी गदारोळ थांबेवल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान आजचे कामकाज स्थगित करताना अध्यक्ष धनखड यांनी केलेल्या टिप्पणीने विरोधी पक्षसदस्य कमालीचे खवळले. या दरम्यान वेलमध्ये आलेले आपचे संजय सिंह यांच्यावर धनखड प्रचंड संतापले व त्यांनी, ‘संजय सिंह, तुम्ही मला कारवाई करण्यास बाध्य करत आहातत' असा इशारा त्यांना दिला. तरीगोंधळ थांबला नाही.

धनखड म्हणाले की, माननीय सदस्यांनो, लाखो लोकांचे दुःख व वेदना मांडण्यासाठीचे हे व्यासपीठ आहे. लोक आमच्याकडून मुद्दाम अपेक्षा करतात. दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरेचे पालन करावे ही भावना जनतेत आहे. ज्याप्रकरणी चर्चेसाठी तुम्ही माझ्या निदर्शनास मुद्दे आणून दिले आहेत त्यावर (चर्चा होऊ शकत नाही असा) मी माझा निर्णय दिला आहे. जनतेचा पैसा इतका उधळला जातो आणि ते आपण करतो हे दुर्दैव आहे. राज्यसभाध्यक्षांच्या या वाक्यानंतर विरोधी पक्षसदस्य प्रचंड खवळून वेलमध्ये आले. ‘जनतेचा पैसा अंबानींना देऊन कोण त्याची उधळपट्टी करत आहे ? अशी टिप्पणी संतप्त विरोधी पक्षनेत्यांनी केली. या गोंधळातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.