MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! केंद्राकडून 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah Narendra Modi

MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! केंद्राकडून 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ

MSP Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यासह, 2023-24 साठी गव्हाचा एमएसपी प्रति क्विंटल 2,125 रुपये झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

गव्हाशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने मसूरच्या एमएसपीमध्येदेखील कमाल 500 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर केला आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2022-23 साठी 6 रब्बी पिकांची एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये गव्हासाठी 110 रुपये, बार्ली 100 रुपये, हरभरा 105 रुपये, मसूर 500 रुपये, मोहरी 400 रुपये तर, करडईच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा: Nagar : सततच्या पावसाने पिके पाण्याखाली; ऐन दिवाळीत शेतकरी चिंतेत-नगर

या पिकांच्या MSP मध्ये वाढ
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्राने गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे.त्यामुळे आता रब्बी हंगाम 2023-24 साठी गहू 2,125 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. 

हेही वाचा: आता राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना'; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

बार्लीचा जुना एमएसपी 1,635 रुपये होता. यामध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता तो 1,735 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. हरभराचा जुना एमएसपी 5,230 रुपये होता, ज्याच्या एएसपीमध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हरभऱ्याची नवीन एमएसपी 5,335 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मसूरचा जुना एमएसपी 5,500 रुपये प्रति क्विंटल होता. ज्यामध्ये 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मसूराल 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे. याशिवाय मोहरीच्या एमएसपीत 400 तर, सूर्यफुलाच्या भावात प्रतिक्विंटल 209 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra ModiFarmermsp