
नवी दिल्ली - भारतातील हा लॉकडाउनचा काळ इजिप्तच्या लहानग्या उमरसाठी इष्टापत्ती ठरला असून त्याला नवे जीवन मिळाले. उमर (वय ११) अत्यंत गुंतागुंतीची हृदशस्त्रक्रिया झाली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया आयआयटी मद्रासने विकसित केलेल्या ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’प्रणालीच्या (व्हीआर - आभासी वास्तव) माध्यमातून झाली.
चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात झालेल्या या शस्त्रक्रियेत हृदयाच्या पंपाचे रोपण करण्यासाठी आभासी वास्तव प्रणालीचा वापर करण्यात आला. उमर आधी अमेरिका व युरोपमधील अनेक रुग्णालयांत उपचारांसाठी जाऊन आला होता. ‘एमजीएम हेल्थकेअर’च्या इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. के. के. बालकृष्णन म्हणाले की, अशा प्रकारची ही भारतातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे. अमेरिकेत ‘व्हीआर’चा वापर करुन दोन शस्त्रक्रिया यापूर्वी झाल्या आहेत.‘अमेरिकन सोसायटी ऑफ अर्टिफिशियल इंटरनल ऑर्गन इन शिकागो’च्या सोमवारी (ता.१) होणाऱ्या वार्षिक परिषदेत या शस्त्रक्रियेसाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कोरोनामुळे ही परिषद ऑनलाइन होणार आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘‘प्ले स्टेशन खेळात वापरले जाणारे चष्मे डोक्यावर लावून त्रिमितीय रचनेतील दृश्याच्या आधारे मुलाचे प्राण वाचू शकतील, असे आधी कोणालाही खरे वाटले नसते. हृदयविकाराशी संबंधित आजार आणि फुफ्फुसावरील उच्च दाब यामुळे उमरच्या जीवाला धोका होता. तसेच गेल्या वर्षांपासून त्याचे हृदयही काम करेनासे झाले होते. लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी त्याला कैरोहून एअर ॲम्ब्युलन्सने चेन्नईत आणले होते,’’ असे डॉ. बालकृष्णन यांनी सांगितले.
यांत्रिक पंपाचे रोपण
अत्यवस्थ असलेल्या उमरवर बॅटरीवर चालणाऱ्या यांत्रिक पंपाचे रोपण करणे हाच एक मार्ग होता. रुग्णालयात जो पंप होता तो प्रौढांसाठी असल्याने त्याच्या छातीत बसवणे अतिशय धोक्याचे होते. डॉ. बालकृष्णन यांनी आयआयटी मद्रासच्या डिझाइन इंजिनिअरिंग विभागात संपर्क साधून मुलांच्या सीटी स्कॅनमधून बनविलेली व्हीआर प्रणाली आण पंपाची विचारणा केली. ते उपलब्ध झाल्यावर मुलावर शस्त्रक्रिया झाली.
मुलाची प्रकृती सुधारली
उमरच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून त्याचे वजनही वाढले आहे. तो बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंध उठल्यानंतर तो व बालरोगतज्ज्ञ असलेली त्याची आई नोहा अलमोहमदी फतुह दशाब कैरोला जाण्याच्या तयारीत आहेत, असे रुग्णालयाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.