
पश्चिम बंगाल धुमसतेय; तृणमूलच्या नेत्यांवर हल्ले; पोलिसांनी अधीर रंजन यांना रोखले
कोलकता : वीरभूम जिल्ह्यातील ८ जणांना जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडालेली असताना आज दोन ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले झाले. नादिया जिल्ह्यात एका तृणमूल काँग्रेस नेत्या असलेल्या महिलेच्या पतीवर गोळीबार करण्यात आला तर हुगळी जिल्ह्यात दुचाकीवरून जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या महिला नगरसेवकाला अज्ञात वाहनाने उडवले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
वीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे मंगळवारी घरांना आगी लावल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तृणमूल कॉंग्रेसचे नेते बहादूर शेख यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात घरे पेटवून दिली होती.गेल्या चोवीस तासांमध्ये हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर भागात नवनिर्वाचित नगरसेवक रुपा सरकार यांना दुचाकीवरून घरी येत असताना अज्ञात मोटारीने जोरात धडक दिली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल रात्री घडली. दुसऱ्या घटनेत नादिया जिल्ह्यात एका स्थानिक तृणमूल नेत्यावर गोळीबार झाला. सहदेव मंडल असे त्यांचे नाव असून बगुला ग्रामपंचायत सदस्या अनिमा मंडल यांचे ते पती आहेत.
शवविच्छेदनाचा धक्कादायक अहवाल
रामपूरहाटच्या जळीतकांडातील आठ जणांचे आलेले शवविच्छेदन अहवाल आणखीच धक्कादायक आहेत. पीडितांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जाळण्यात आल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या आणि न्यायवैद्यक पथकाने अहवालात म्हटले आहे.
Web Title: Case Burning Alive 8 Persons Birbhum Tmc Leaders Attacked In West Bengal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..