जातीय समीकरणांचे पारडे जड

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

- ओबीसी नेतृत्वाला राजस्थानमध्ये संधी 
- कमलनाथ यांचे नाव मध्य प्रदेशात आघाडीवर 
- बाघेल, कवासी यांची छत्तीसगडमध्ये चर्चा 

नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी तीन राज्यांतील निकालांमुळे कॉंग्रेला लाभ होणार असून, हाच उत्साह कायम ठेवत आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे जोरदार प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी कॉंग्रेसमध्ये नेत्यांचे लॉबिंग सुरू झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा मुकुट कोणाच्या डोक्‍यावर ठेवायचा याचे सर्वाधिकार तिन्ही राज्यांतील आमदारांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपविले आहेत. त्यामुळे गांधी यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून गेहलोत समर्थक आणि पायलट समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे कॉंग्रेसने आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्याचे टाळले. मात्र, "ओबीसी नेतृत्वाला' पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविल्याचे सूत्रांकडून कळते. यामुळे अशोक गेहलोत यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्‍चित झाल्याचे समजते. राजस्थानात 199 जागांच्या विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे 99 आमदार निवडून आल्यामुळे स्वबळावर बहुमताचा 101 हा आकडा पार करता आलेला नाही. परंतु, बहुजन समाज पक्ष, लोकतांत्रिक जनता दल आणि विशेषतः अपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु, मुख्यमंत्री कोण असणार या मुद्‌द्‌यावरून अशोक गेहलोत आणि सचिन पाटलट यांच्यातील मतभेद उघडपणे पुढे आल्याने आणि दोन्ही नेत्यांमधील चुरशीची जागा समर्थकांच्या रस्त्यावरील भांडणाने घेतल्यामुळे पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. 

पक्षाच्या यशासाठी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी घेतलेली मेहनत पाहता त्यांना मुख्यमंत्रिपद मिळावे अशी गुज्जर समर्थकांनी आक्रमक मागणी केली आहे. परंतु राजस्थामधील जातीय समीकरण पाहता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे आणि अपक्षांना सोबत घेऊन अल्पमतातील सरकार टिकविण्याचे आव्हान असेल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याआधीही ही कामगिरी पार पाडून दाखविली असल्याने त्याचप्रमाणे राज्यातील 13 अपक्षांमधील आठ आमदार हे गेहलोत समर्थक असल्याने अनुभव, ओबीसी नेतृत्व आणि सरकारच्या स्थैर्याचा निकष लावून गेहलोत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याकडे पक्ष नेतृत्वाचा कल असल्याचे कॉंग्रेस मुख्यालयातील खात्रीलायक सूत्रांकडून कळते. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा अखिल भारतीय कॉंग्रेस समितीमध्ये सरचिटणीस पदाची ऑफर दिली जाऊ शकते.

दरम्यान, जयपूर येथे आज नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर नेता निवडीचे सर्वाधिकार कॉंग्रेस अध्यक्षांकडे सोपविण्याचा औपचारिक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच कॉंग्रेसने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला, मात्र विधिमंडळ पक्षनेत्याचे जाहीर करण्यात आले नाही. केंद्रीय निरीक्षक के. सी. वेणूगोपाल उद्या पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना अहवाल सादर करणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी नावाची घोषणा होईल, असे कॉंग्रेसमधून सांगण्यात आले. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हेदेखील उद्या दिल्लीत पोचणार असल्याचे कळते. 

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळ जवळ निश्‍चित मानले जात आहे. राजस्थानात अनुभवी नेते असलेल्या अशोक गेहलोत यांचे पारडे जड मानले जात असले, तरी पक्षाचे दुसरे नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. छत्तीसगडमध्येही सीएमच्या खुर्चीसाठी रस्सीखेच सुरू आहे. मध्य प्रदेशात निवडून आलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची आज बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची निवड करण्याचे सर्वाधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्याबाबतचा एका ओळीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कॉंग्रेस नेतृत्वाने ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांना चाचपणी करण्यासाठी मध्य प्रदेशात पाठविले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी वरिष्ठ नेत्यांसह राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा सादर केला. 

आमदारांच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, की नवनियुक्त आमदारांनी निर्णयाचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना दिले आहेत. ते निश्‍चित करतील त्याला आमचा पाठिंबा असेल. कॉंग्रेसकडे बहुमतासाठी आवश्‍यक संख्याबळ असल्याचा दावा कमलनाथ यांनी केला. त्यांनी मायावतींचीही भेट घेतली. दरम्यान, कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्रिपद देण्यात यावे असा सूर लावला. स्थानिक समीकरणे ध्यानात घेऊन कमलनाथ यांच्या नावाला पक्ष नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळू शकतो, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक बुधवारी रात्री झाली. छत्तीसगड कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल आणि सलग पाचव्यांदा आमदार झालेले कवासी लकमा यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहे. राहुल गांधी जे काम देतील ते करू, अशी भूमिका कवासी यांनी घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caste Factor is Most Important in CM Selection