'CBI, ईडीचं माझ्या मुलावर प्रेम'; काँग्रेस नेत्याच्या आईची उपरोधिक टीका

सकाळ ऑनलाईन
Monday, 5 October 2020

त्यांना काय शोध घ्यायचा आहे, तो घेऊद्या. काय घ्यायचं आहे ते घेऊद्या. पण त्यांना काहीच मिळणार नाही.

बंगळुरु- सीबीआय, प्राप्तिकर विभाग आणि ईडी यांचे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. त्यामुळेच ते वारंवार आमच्याकडे येतात, अशी उपरोधिक टीका कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या आई गौरम्मा यांनी केली आहे. डी के शिवकुमार यांच्या घरावर गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा छापे मारण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना अटकही करण्यात आली होती. सोमवारी पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आल्याने गौरम्मा यांनी नाराजी व्यक्त केली. 

त्या पुढे म्हणाल्या की, त्यांना काय शोध घ्यायचा आहे, तो घेऊद्या. काय घ्यायचं आहे ते घेऊद्या. पण त्यांना काहीच मिळणार नाही. त्यांनी माझ्या मुलाला अटक करावी, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

डी के शिवकुमार यांच्या घरावर आणि त्यांच्या 14 मालमत्तांवर आज (दि.5) सीबीआयने छापेमारी केली. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी के सुरेश यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये 9, दिल्लीत 4 आणि मुंबईतील एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी शिवकुमार यांच्यासह इतरांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. 

डी के शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी के सुरेश यांच्याविरोधात उत्पन्नाहून अधिक संपत्ती संपादित केल्याचा आरोप आहे. उत्पन्नाहून अधिक संपत्ती संपादित केल्याप्रकरणी शिवकुमार मागील 2 वर्षांपासून ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. मागील वर्षी ईडीने शिवकुमार यांना मनी लाँड्रिगप्रकरणी अटकही केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI IT ED love my son thats why they come again and again says dk shivakumar mother Gowramma