CBSE बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार: फॉर्म्युला SC मध्ये सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student

CBSE बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार: फॉर्म्युला SC मध्ये सादर

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने Central Board of Secondary Education (CBSE) गुरुवारी 12 वीच्या विद्यार्थ्यांना ( Class 12 examinations) दिले जाणारे ग्रेड किंवा गुण याचे मुल्यांकन निकष सुप्रीम कोर्टासमोर सादर केले आहेत. सुप्रीम कोर्टाने 3 जूनला सीबीएसईला दोन आठवड्यांना कालावधी दिला होता. या काळात बोर्डाला कोर्टासमोर बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार याबाबत माहिती द्यायची होती. (CBSE presents evaluation criteria for Class 12 before Supreme Court results to be out by July 31)

CBSE बोर्डाने कोर्टाला सांगितलं की, 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीमधील कामगिरीच्या आधारावर देण्यात येईल. यात दहावी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रत्येकी 30 टक्के महत्त्व असेल आणि त्यांच्या 12 वीमधील कामगिरीच्या आधारावर त्यांना 40 टक्के गुण देण्यात येतील. 12 वी वर्गातील सत्राची परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षेचे मार्क ग्रहित धरले जातील. निकाल 31 जूलैल जाहीर केला जाईल.

अॅटोर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी कोर्टात सांगितलं की, सर्व शाळा एकाच पद्धतीने गुण देतील यावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल. त्यांनी असंही सांगितलं की निकाल 31 जूलैला जाहीर करण्यात येईल. दहावी आणि अकरावीच्या पाच विषयांपैकी सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांचे मार्क ग्रहित धरले जातील, असं सांगण्यात आलंय. सीबीएसईने 4 जून रोजी एका समितीची स्थापना केली होती. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन निकष ठरवण्याची जबाबदारी या समितीवर होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून रोजी बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतला होता. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याचं विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केलं.

टॅग्स :CBSE Board