esakal | कर्नाटकात आता उपचारावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Camera

कर्नाटकात आता उपचारावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

बंगळूर - कोरोना (Corona) व इतर रुग्णांवर (Patient) उपचार (Treatment) करण्यात येत असलेल्या जिल्हा व तालुका रुग्णालयांतील आयसीयू (ICU) व इतर वॉर्डात आता सीसीटीव्हीची (CCTV Watch) नजर राहणार आहे. अशा सर्व वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने (Health Department) दिला आहे. (CCTV cameras will now keep an eye on the treatment in Karnataka)

मंगळवारपूर्वी (ता.११) राज्यातील सर्व जिल्हा व तालुका रुग्णालयांतील वॉर्ड व आयसीयू कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निर्देश रुग्णालयाचे संचालक, वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयांचे शल्य चिकित्सक व व्यवस्थापन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी येणारा खर्च आरोग्य सुरक्षा समितीच्या अनुदानातून किंवा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या इतर अनुदानातून करण्यात यावा, असेही सूचविण्यात आले आहे. जिल्हा व तालुका रुग्णालयात कोरोना व इतर रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारासंदर्भात अलीकडे तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन, औषधे व इतर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील चामराजनगर, गुलबर्गा, हुबळीसह विविध जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेऐवजी रुग्णांचा इतर काही कारणामुळे मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी व सरकारने केला आहे. परंतु विरोधी पक्षांनी हा विषय उचलून धरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे.