दिल्लीत कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्राने घेतले 'हे' निर्णय    

टीम ई-सकाळ
रविवार, 14 जून 2020

देशाची राजधानी दिल्ली मध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, केंद्र सरकारने दिल्लीला कोरोनासाठी रेल्वेने बनवलेले ५०० डबे देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली मध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, केंद्र सरकारने दिल्लीला कोरोनासाठी रेल्वेने बनवलेले ५०० डबे देणार असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून दिल्ली मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अधिकच वाढ होत असल्याचे चित्र समोर आले होते. त्यानंतर आज गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यसह बैठक घेत कोरोनाच्या नियंत्रणासाठी काही निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्विटर या सोशल माध्यमाद्वारे दिली आहे.   

दिल्ली मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बऱ्याच रुग्णालयात बेडची कमतरता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर गृह मंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री अरविद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल व आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह बैठक घेत रेल्वेने बनवलेले ५०० डबे दिल्लीला पुरवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दिल्लीतील बेडची संख्या ८००० ने वाढणार असलयाचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय येत्या दोन दिवसात दिल्लीतील कोरोना चाचणीची क्षमता दुप्पटीने आणि सहा दिवसांनंतर ही क्षमता तीन पटीने वाढवणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून अमित शहांनी सांगितले आहे. तसेच दिल्लीतील प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण करुन ऑक्सिजन सिलेंडर व व्हेंटिलेटरचा पुरेसा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच दिल्लीत खासगी रुग्णालयातील ६० टक्के बेड्स कमी दरात उपलब्ध करण्यासाठी आणि कोरोना चाचणी व उपचाराचे दर निश्चित करण्यासाठी डॉ. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. 

दरम्यान, संपूर्ण देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ लाख २० हजार ९२२ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ९ हजार १९५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर सध्या १ लाख ४९ हजार ३४८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी २२००० रुग्ण दिल्लीत उपचार घेत आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र व त्यानंतर तमिळनाडू या राज्यांमध्ये आहेत.          

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Center took this decision to control the corona in Delhi