राहुल यांची घोडदौड लोकसभेने रोखली

पीटीआय
Sunday, 11 August 2019

यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्या नेत्यांइतकी उंची गाठण्यात यशस्वी ठरले नाहीत.

नवी दिल्ली : यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्या नेत्यांइतकी उंची गाठण्यात यशस्वी ठरले नाहीत. अध्यक्षपदाच्या काळात तीन राज्यांतील विजय हीच मोठी उपलब्धी. यापूर्वीच्या नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांनी केंद्रात अधिककाळ सत्ता राखण्यात यश मिळवले होते. 

कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांचा कार्यकाळ वीस महिन्यांचा राहिला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानची विधानसभा निवडणूक जिंकली. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला धक्का बसला. अध्यक्षपदी असताना गांधी यांनी पक्षातील कार्यपद्धती व शैली बदलण्याचा प्रयत्न केला.

तिकीट वाटप, संघटन कौशल्य आणि कार्यशैलीत पारदर्शकता आणण्यासाठी पावले उचलली. त्याचबरोबर संघटनेत निवडणूक करण्याची परंपरा सुरू केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे चिरंजीव असणारे राहुल यांच्या राजकीय कारकिर्दीकडे माध्यम, जनता, बौद्धिक वर्ग यांचे लक्ष राहिले. राहुल हे अगोदर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले आणि नंतर डिसेंबर 2017 रोजी गुजरात निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा थोडक्‍यात पराभव झाला असला तरी राजकीय तज्ञांनी राहुल यांच्या नेतृत्व गुणांची आणि रणनितीची तारीफ केली.

गांधी अध्यक्ष झाल्यानंतर 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. तर 2018 च्या उत्तरार्धात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान निवडणुकीत यश मिळवले. त्यामुळे राहुल यांचे नेतृत्व अधोरेखित झाले आणि विश्‍वास अधिक दृढ झाला. लोकसभेतही अशीच कामगिरी राहील, असे भाकित वर्तविले जाऊ लागले. या तिन्ही राज्यांतील यशाने उत्साहीत झालेल्या कॉंग्रेस आणि राहुल यांना 2019 च्या लोकसभेत कमबॅक होईल, असे वाटू लागले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत यश मिळवून कॉंग्रेसच्या स्वप्नावर पाणी फेरले. त्याचबरोबर पारंपरिक मतदारसंघ अमेठीतही राहुल यांना पराभव पत्करावा लागल्याने कॉंग्रेसला दोन धक्के सहन करावे लागले. 

लोकसभेच्या जागांत किरकोळ वाढ 

लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाची निराशाजनक कामगिरी ही पक्ष नेत्यांची चिंता वाढविणारी होती. 2014 मध्ये देशभरात 44 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यात किरकोळ वाढ होऊन ती संख्या 52 वर पोचली. लोकसभा निवडणूकपूर्वी किंवा निवडणूक काळात राजकीय तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, कॉंग्रेस जर शंभर जागा जिंकत असेल तर राहुल गांधी यांच्यासाठी जमेची बाजू राहील. 

प्रचारातून मोदींना लक्ष्य 

कॉंग्रेसचा लोकसभेतील प्रचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोकस करणारा होता. राफेल विमान खरेदी करारात भ्रष्टाचाराचा आरोप करत "चौकीदार चोर है' असा प्रचार केला गेला. या प्रचाराला उत्तर देण्यासाठी मोदी आणि भाजप यांनी "मैं भी चौकीदार' मोहीम सुरू केली. मात्र कॉंग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला आणि कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत 25 मे रोजी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या वेळी त्यांचा राजीनामा नामंजूर केला आणि पक्षीय बदलाचे अधिकार प्रदान केले. मात्र राहुल हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chairmanship Stopped after Rahul Gandhi Defeated in Amethi