मुंबई काँग्रेसमध्ये भाईंवर नियंत्रण हांडोरेंचे;श्रेष्ठींच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाने मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये गोंधळ 

मुंबई काँग्रेसमध्ये भाईंवर नियंत्रण हांडोरेंचे;श्रेष्ठींच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाने मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये गोंधळ 

नवी दिल्ली - मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षांच्या निवडीनंतर आता पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामुळे नेत्यांमध्ये गोंधळ वाढल्याचे कळते. भाई जगताप यांना अध्यक्ष केले असले तरी, संघटनात्मक नियंत्रणाची जबाबदारी चंद्रकांत हांडोरे आणि समन्वयाची जबाबदारी अमरजितसिंग मनहान्स यांना सोपवून जगताप यांच्या अधिकारांना चाप लावण्यात आल्याचे चित्र आहे. 

काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ डिसेंबरला झालेल्या काँग्रेसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात जगताप यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या २९ डिसेंबरच्या कार्यक्रमात पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांनी ‘माझी मुंबई – माझी काँग्रेस’ या शीर्षकाखालील १०० दिवसांचे नियोजन अध्यक्ष भाई जगताप यांना देण्यात आले. यात त्यांच्या अधिकारांना कात्री लावल्याचे निरीक्षण या सूत्रांनी नोंदवले. 

श्रेष्ठींनी दिलेल्या नियोजनात दहा दिवसांत स्थानिक नेत्यासमवेत १० सभा आणि १०० दिवसांत १०० किलोमीटरची पदयात्रा काढण्याचे उद्दिष्ट भाई जगताप यांना देण्यात आले असून लवकरात लवकर कार्यकारिणी नेमण्याचे, सभासद नोंदणी मोहीम जाहीर करण्याचे आणि ४५ दिवसात सर्व संलग्न संघटना, विभागांची फेररचना करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना प्रदेश काँग्रेसमधील मुंबई काँग्रेसचे प्रभारी बनवून नियंत्रणाचे अधिकार सोपविले आहेत. हांडोरे यांना मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील समन्वय हाताळण्यास सांगितले आहेच, कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांवर आणि समित्यांच्या कामकाजावरही देखरेख ठेवण्याचे अधिकारही हांडोरे यांना सोपविण्यात आले असून याबाबतचा साप्ताहिक आणि पाक्षिक अहवाल राज्य प्रभारींना तेच सादर करतील. यामुळे भाई जगताप यांची नाराजी वाढल्याचे कळते. 

अशाच प्रकारे, मुंबई काँग्रेस आणि राज्य सरकारदरम्यान समन्वय राखण्याचे अधिकार समन्वय समिती प्रमुख अमरजितसिंग मनहान्स यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मदतीने पक्षकार्याचाही समन्वय मनहान्स हेच सांभाळतील. यासाठी अमरजितसिंग मनहान्स यांनाही १५ जानेवारीपर्यंत समन्वय समिती नेमण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, पक्षाची रणनिती आखणाऱ्या आणि उमेदवारी छाननी समितीमध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी असतील. तर भाई जगताप यांना उपाध्यक्ष बनविण्यात आले असून, सर्व माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष हे या समितीमध्ये पदसिद्ध सदस्य असतील. 

आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन प्रचार समिती प्रमुख नसीम खान यांना पंधरा जानेवारीपर्यंत समितीच्या सदस्यांची तसेच प्रचाराच्या संभाव्य मुद्द्यांची यादी देण्यास सांगण्यात आले आहे. तर, कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग साप्रा यांना मुंबई काँग्रेसच्या संलग्न संघटना (युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल) आणि विभागांवर देखरेख करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय व्हा! 
मुंबई प्रदेश काँग्रेस सोशल मीडियावर सक्रीय नसल्याचे कारण देत श्रेष्ठींनी निवडणुकीसाठी सोशल मीडिया कार्यकर्ते तयार करण्याचे आदेश दिले असून मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांसाठी स्वतंत्र फेसबुक पेज, ट्विटर हॅंडल, इन्स्टाग्राम अकाऊंट करावे आणि व्हॉट्सअॅप ग्रुप देखील सुरू करण्याचे आदेश अध्यक्ष भाई जगताप यांना देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com