esakal | Chandrayaan 2 : विक्रम'चा संपर्क तुटला, हिंमत कायम 
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrayaan 2   COMMUNICATION WITH THE LANDER HAS BEEN LOST

चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना "चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा "इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. 

Chandrayaan 2 : विक्रम'चा संपर्क तुटला, हिंमत कायम 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर - चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना "चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा "इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. चंद्रावर यान उतरविण्याची किमया यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी केली आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यान उतरविणे एकाही देशाला शक्‍य झाले नव्हते. 

"चांद्रायन 2'मधील "विक्रम' लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात "मॅंझिनस सी' आणि "सिंपेलिअस एन' या दोन विवरांच्या मध्ये उतरविण्यात येणार होते. चंद्राच्या 67 अक्षांशाच्या जवळ उतरविण्यासाठी विषुववृत्ताशी अचूक 90 अंशांचा कोन करणारी कक्षा मिळणे आवश्‍यक होते. चांद्रभूमीपासून 30 किलोमीटर अंतरावर असताना पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रम लॅंडर उतरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठीच्या आज्ञावली बंगळूरच्या इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून देण्यात आल्या. "विक्रम'चा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एक वाजून 48 मिनिटांनी विक्रम चंद्रापासून केवळ 7.4 किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर त्याच्या दिशादर्शक यंत्रणांच्या साह्याने जागेची निश्‍चितीही करण्यात आली होती. मात्र चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. नियोजित वेळेनंतही तो प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे भारताचे चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याचे स्वप्न भंग पावले. 

भारताचा विक्रम अनुभवण्यासाठी पंतप्रधानांसह देशविदेशातील शास्त्रज्ञ "इस्रो'च्या बंगळूर येथील मुख्यालयात उपस्थित होते. पंतप्रधानांसह देशभरातील 74 विद्यार्थीही ही ऐतिहासिक मोहीम अनुभविण्यासाठी बंगळूरला उपस्थित होते. संपर्क तुटल्यानंतर "इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी पंतप्रधानांना त्याची माहिती दिली. संपर्क तुटला असला, तरी कदाचित तो पुन्हा प्रस्थापित होण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. 

चंद्रावर उतरण्यापूर्वीची 15 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतील असे शास्त्रज्ञांनी आधीपासून सांगितले होते. या 15 मिनिटांतील "रफ ब्रेकिंग' योग्य पद्धतीने झाले. मात्र "सॉफ्ट ब्रेकिंग'च्या वेळी विक्रम लॅंडरचा संपर्क तुटला. "इस्रो'चे शास्त्रज्ञ आता हाती असलेल्या माहितीचे विश्‍लेषण करून पुढील दिशा ठरविणार आहेत. 

loading image