Chandrayaan 2 : असे भटकले विक्रम लँडर चंद्रापासून

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

'चांद्रायन 2'मधील 'विक्रम' लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'मॅंझिनस सी' आणि 'सिंपेलिअस एन' या दोन विवरांच्यामध्ये उतरविण्यात येणार होते. चंद्राच्या 67 अक्षांशाच्या जवळ उतरविण्यासाठी विषुववृत्ताशी अचूक 90 अंशांचा कोन करणारी कक्षा मिळणे आवश्‍यक होते.

बंगळूर : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लँडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. मात्र हे यान नक्की कशामुळे भटकले याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

'चांद्रायन 2'मधील 'विक्रम' लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'मॅंझिनस सी' आणि 'सिंपेलिअस एन' या दोन विवरांच्यामध्ये उतरविण्यात येणार होते. चंद्राच्या 67 अक्षांशाच्या जवळ उतरविण्यासाठी विषुववृत्ताशी अचूक 90 अंशांचा कोन करणारी कक्षा मिळणे आवश्‍यक होते. चांद्रभूमीपासून 30 किलोमीटर अंतरावर असताना पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रम लँडर उतरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठीच्या आज्ञावली बंगळूरच्या इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून देण्यात आल्या. 'विक्रम'चा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एक वाजून 48 मिनिटांनी विक्रम चंद्रापासून केवळ 7.4 किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर त्याच्या दिशादर्शक यंत्रणांच्या साह्याने जागेची निश्‍चितीही करण्यात आली होती. मात्र चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. नियोजित वेळेनंतही तो प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे भारताचे चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याचे स्वप्न भंग पावले. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. चंद्रावर यान उतरविण्याची किमया यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी केली आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यान उतरविणे एकाही देशाला शक्‍य झाले नव्हते. 

संबंधित बातम्या -
Video : इस्त्रोच्या अध्यक्षांना अश्रू अनावर; मोदींकडून सांत्वन
Chandrayaan 2 : विक्रम'चा संपर्क तुटला, हिंमत कायम 
Chandrayaan 2 : देश तुमच्या पाठिशी, हिंमत हारू नका : मोदी 
Chandrayaan2 : 'Proud Of You'; देश देतोय ISROला पाठिंबा 
Chandrayaan 2 : शास्त्रज्ञांनो, देशाला तुमचा अभिमान : मोदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 how ISRO lander Vikram lost his way in 15 minutes