Chandrayaan 2 : 'विक्रम'चे फोटो 'नासा'कडे!

पीटीआय
Thursday, 19 September 2019

भारताच्या "चांद्रयान 2' यानाचा "विक्रम' लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या भागात आदळला, त्या भागातील छायाचित्र "नासा'च्या "लुनार रिकन्सान्स ऑर्बिटर' (एलआरओ) काढली असून, त्याचे विश्‍लेषण करून वैधता तपासण्यात येत आहे

ह्युस्टन : भारताच्या "चांद्रयान 2' यानाचा "विक्रम' लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या भागात आदळला, त्या भागातील छायाचित्र "नासा'च्या "लुनार रिकन्सान्स ऑर्बिटर' (एलआरओ) काढली असून, त्याचे विश्‍लेषण करून वैधता तपासण्यात येत आहे, अशी माहिती "नासा'च्या प्रकल्प शास्त्रज्ञाने दिल्याचे वृत्त येथील प्रसारमाध्यमांनी गुरुवारी दिले. 

चंद्राच्या ज्या भागात "विक्रम' लॅंडर आहे, त्यावरून भ्रमण करताना "एलआरओ'ने मंगळवारी (ता. 17) त्याची अनेक छायाचित्रे काढली आहेत. "ऑर्बिटर'च्या कॅमेऱ्याने "विक्रम'ची छायाचित्रे टिपली असल्याचे "नासा'ने अधिकृत दुजोरा दिला असून "एलआरओ'चे उपप्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी याबाबतचे निवेदन शेअर केले आहे.

"सीनेट.कॉम' या संकेतस्थळावरील माहितीनुसार केलर म्हणाले की, लॅंडर दृष्टिपथात आहे की नाही हे तपासण्यासाठी (विक्रम लॅंडर हे सावलीत अथवा कॅमेऱ्याच्या टप्प्याच्या बाहेर असण्याची शक्‍यता आहे) "एलआरओसी'चे पथक नव्या छायाचित्रांचे विश्‍लेषण करून जुन्या छायाचित्रांशी त्याची तुलना करणार आहे. 

"नासा' छायाचित्रांची सत्यता, विश्‍लेषण आणि परीक्षण करीत आहे. "ऑर्बिटर त्या भागावरून जात असताना तेथे चांद्रधूळ होती. म्हणजेच चंद्राच्या मोठ्या भागावर सावली होती, असे या वृत्तात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 Nasa lunar orbiter photographs Vikram landing site but lander not spotted yet