Chandrayaan 2 : 'विक्रम'चे चंद्रावरील पाऊल अवघ्या तीन दिवसांवर

वृत्तसंस्था
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

चांद्रधुळीचे आव्हान 
'विक्रम' लँडर चंद्रावर उतरण्यावेळी चंद्रावरील धुळीचे आव्हान असेल. सात सप्टेंबर रोजी पहाटे 1.55 वाजता ही कामगिरी पार पाडण्यात येणार आहे. 'विक्रम' उतरल्यानंतर साधारण तीन तासांनी त्यातील प्रग्यान ही बग्गी चांद्रभूमीवर उतरेल.

बंगळूर : चांद्रयान-2 मोहिमेत 'विक्रम' हा लँडर मुख्य यानापासून वेगळा झाल्यानंतर आता अवघ्या तीन दिवसांनंतर विक्रम चंद्रावर उतरणार आहे. मंगळवारी चांद्रयानाने एक महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर आज (बुधवार) पहाटे दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला. 

'विक्रम' लँडरने आज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी यशस्वीपणे चंद्राच्या नव्या कक्षेत प्रवेश केल्याने चंद्रापासूनचे अंतर आणखी कमी झाले होते. आता आज पहाटे 3 वाजून 42 मिनिटांनी दुसऱ्या कक्षात यशस्वी प्रवेश केला. 'विक्रम' लँडरची चंद्राभोवतीची कक्षा आता 35 किमी x 101 किमी करण्यात आली आहे. 'विक्रम' लॅंडर चंद्राच्या आणखी जवळ गेला आहे. चंद्राच्या भूमीवर 'विक्रम' लॅंडरला उतरविण्यासाठी आता फक्त तीन दिवसांचा कालावधी राहिला आहे. चांद्रयान व लॅंडरचे कार्य नियोजनानुसार सुरळीत होत असल्याचे 'इस्रो'ने सांगितले.

'विक्रम'चा प्रवास आता चंद्राभोवती उलट दिशेने सुरू झाला आहे. चांद्रयान-2 पासून वेगळे झाल्यानंतर 'विक्रम' लँडर सुमारे 20 तास आपल्या यानाच्या कक्षेतच फिरत होता. आता यानाच्या उलट दिशेने 'विक्रम'चा प्रवास सुरू झाला आहे. याला 'डी ऑर्बिट' म्हणतात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वी 'विक्रम' 4 किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. 

चांद्रधुळीचे आव्हान 
'विक्रम' लँडर चंद्रावर उतरण्यावेळी चंद्रावरील धुळीचे आव्हान असेल. सात सप्टेंबर रोजी पहाटे 1.55 वाजता ही कामगिरी पार पाडण्यात येणार आहे. 'विक्रम' उतरल्यानंतर साधारण तीन तासांनी त्यातील प्रग्यान ही बग्गी चांद्रभूमीवर उतरेल. चंद्रावर उतरण्याची कामगिरी 'इस्रो' पहिल्यांदाच करणार आहे. या यशानंतर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरेल. यापूर्वी अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरविली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 Vikram Pragyan get even closer to Moon