Chandrayaan 2 : देश तुमच्या पाठिशी, हिंमत हारू नका : मोदी 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

भारतमातेच्या जयजयकारासाठी तुम्ही जगता, भारतमातेसाठी तुम्ही पूर्ण आयुष्य घालविता. मी शुक्रवारी रात्री तुमची मानसिकता समजू शकलो. तुमचे डोळे खूप काही बोलत होते आणि तुमच्या चेहऱ्यावरील दुःख मी पाहू शकत होतो. त्यामुळे मी तुमच्यात जास्त वेळ थांबलो नाही. त्यामुळे मी आज पुन्हा तुमच्याशी बोलणे ठरविले. देश इस्त्रोच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

बंगळूर : आपण काही अडचणींमुळे चंद्रावर पोहचू शकलो नाही. पण, रात्रंदिवस काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे कौतुक आहे. देश इस्त्रोच्या पाठिशी आहे. अडचणी आल्या तरी हिंमत हारू नका, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय़त्न केला.

चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. भारताचा विक्रम अनुभवण्यासाठी पंतप्रधानांसह देशविदेशातील शास्त्रज्ञ 'इस्रो'च्या बंगळूर येथील मुख्यालयात उपस्थित होते. आज (शनिवार) सकाळी मोदींनी पुन्हा एकदा शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

मोदी म्हणाले, की भारत माता की जय, भारतमातेच्या जयजयकारासाठी तुम्ही जगता, भारतमातेसाठी तुम्ही पूर्ण आयुष्य घालविता. मी शुक्रवारी रात्री तुमची मानसिकता समजू शकलो. तुमचे डोळे खूप काही बोलत होते आणि तुमच्या चेहऱ्यावरील दुःख मी पाहू शकत होतो. त्यामुळे मी तुमच्यात जास्त वेळ थांबलो नाही. त्यामुळे मी आज पुन्हा तुमच्याशी बोलणे ठरविले. देश इस्त्रोच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. या मोहिमेशी जोडलेला प्रत्येक व्यक्ती वेगळ्याच परिस्थितीत होता. संपर्क तुटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील भाव मी पाहिले. हे कसे झाले, कशामुळे झाले असे अनेक प्रश्न होते. आज काही अडचणी आल्या असतील. पण, आपले धैर्य कमी झालेले नाही. आता आपण आणखी कणखर झालेलो आहोत. इस्त्रो हार न मानणारी संस्था आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan2 Prime Minister Narendra Modi interacts with scientists at ISRO Centre in Bengaluru