'चांद्रयान 2'चा महत्त्वाचा टप्पा पार! चंद्राच्या कक्षात मार्गक्रमण

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली.

बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 

चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayan 2 Successfully Enters Into Lunar Orbit Of Moon says Isro