Chardham Yatra : हिमाच्छादित केदारनाथवर कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chardham Yatra Plastic waste Garbage at Kedarnath threat of catastrophic crisis

हिमाच्छादित केदारनाथवर कचऱ्याचे ढीग

डेहराडून : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला सुरूवात होऊन सुमारे २० दिवस झाले आहे. केदारनाथला भाविकांची गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर भाविकांनी मार्गावर टाकलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा छायाचित्रे ‘एएनआय’ने शेअर केली आहेत. येथील कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे केली नाही तर २०१३ प्रमाणे भीषण संकटाचा धोका वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर यात्रा भरली असल्याने भाविकांची संख्या उच्चांकी आहे. पण निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भूमीला भाविकांच्या हलगर्जीमुळे कचऱ्याचे गालबोटही लागले आहे.

केदारनाथ हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे आणि मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्याने त्याची धूप होण्याची शक्यता आहे, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गढवाल सेंट्रल विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख प्राध्यापक एम. एस. नेगी म्हणाले, की केदारनाथसारख्या संवेदनशील ठिकाणी ज्या पद्धतीने प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग लागले आहेत, त्यामुळे धूप होऊन भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. ‘एचएपीपीआरसी’चे संचालक प्रा.एम. सी. नौटियाल म्हणाले, ‘‘पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. येथे स्वच्छता सुविधांचा अभाव असल्याने वनस्पतींवर नकारात्मक परिणाम होत आहे. २०१३ मध्ये केदारनाथला उद्‍भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचे कायम स्मरण ठेवत खबरदारी बाळगण्याची गरज आहे. त्यावेळी ढगफुटीमुळे पूर व भूस्खलाने मोठा विनाश झाला होता. भारतातील सर्वांत मोठ्या नैसर्गिक संकटांपैकी हे संकट होते.

चारधाम यात्रेसंदर्भातील बैठकीत जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष अमरदेई शहा यांनी पर्यटन मंत्री सत्पाल महाराज यांच्यासमोर या तीर्थस्थानावरील कचऱ्याची समस्या मांडली होती. केदारनाथच्या पादचारी मार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी पूर्वी जिल्हा पंचायतीकडे होती. पण तेथे आलेल्या संकटानंतर हे काम सुलभ इंटरनॅशनल या खासगी संस्थेला दिले गेले. यानंतर तेथे घाण वाढू लागली आहे. या तक्रारीनंतर सतपाल महाराज यांनी स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याचे निर्देश ‘सुलभ’ला दिले. यानंतरही कामाच कुचराई केल्यास संस्थेविरोधात कडक कारवाई करण्याचा आदेशही मंत्र्यांनी दिला आहे.

एक क्विंटल कचरा जमा

‘‘केदारनाथ येथे स्वच्छता राखण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मंदिरापासून शंकराचार्यांचे समाधीस्थळ, प्रवचन हॉल, भैरवनाथ आणि अन्य ठिकाणची स्वच्छता केली आहे, असा दावा जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी केला आहे. स्वच्छता मोहिमेद्वारे एक क्विंटल प्लॅस्टिक आणि टाकाऊ वस्तू जमा केल्या असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल, असे त्यांनी सांगितले.

माशांमध्ये सापडले प्लॅस्टिकचे अवशेष

श्रीनगर : काश्मीरमधील अलकनंदा नदीतील माशांच्या शरीरात मायक्रो प्लॅस्टिकचे अवशेष आढळल्याचा दावा, उत्तराखंडच्या हेमावतीनंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठाच्या हिमालयीन जैवविविधता विभागाने केला आहे. डॉ. जलपालसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. पर्वतीय प्रदेशातील नद्यांमधील जैवविविधतेची ही परीस्थिती असेल तर ज्या नद्यांमध्ये रसायने, प्लॅस्टिक आणि हानिकारक घटक थेट टाकले जातात त्या नद्यांची परिस्थिती किती बिकट असेल याचा अंदाज येऊ शकतो. ही बाब माशांप्रमाणेच, माशांचा आहार घेणाऱ्या मानवासाठी देखील हानिकारक आहे.'' असे संशोधकांचे मत आहे.

चारधाम यात्रा सुरु झाल्यापासून येथे रोज सुमारे १८ हजारपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्याचवेळी पाच हजारपेक्षा जास्त स्थानिक नागरिक येथे वास्तव्यास आहेत. १४ दिवसांत अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर येथे स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहेत.

- धनंजय पाठक, मुख्य अधिकारी, सुलभ संस्था

Web Title: Chardham Yatra Plastic Waste Garbage At Kedarnath Threat Of Catastrophic Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top