पाकिस्तानच्या उंबरठ्यावर मराठा रेजिमेंटकडून छत्रपतींची प्रतिकृती

चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajSakal
Updated on

काश्‍मीर : देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे. समाज माध्यमांवर ही सध्या या मूर्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Kashmir)

हातात तलवार घेऊन घोड्यावर विराजमान असलेले शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती थेट सैन्यदलातील मावळ्यांसोबत नंगा पर्वताकडे पाहत शत्रूवर नजर ठेवत असल्याचे हे मुर्तीकडे पाहून वाटते. मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृत्या स्थापित करण्यात आल्या आहेत. या दोन्‍ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत. मच्छल बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मूर्तीच्या माध्यमातून जम्मू काश्‍मीरमधील नागरिकांना देखील शिवाजी महाराजांची माहिती मिळत आहे.

याबाबत कर्नल पवार यांनी सांगितले, ‘‘मराठा समाजाला एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी शत्रूला आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांची फौजेप्रमाणे आज लष्कराचे सैन्य देखील सीमेवर शत्रूशी लढत आहे. शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत. गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्याची कल्पना सुचली. यासाठी पुण्यातून मुर्ती मागविण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान या मूर्तीची स्थापना करण्यात आली. जवान उठल्यावर त्यांना महाराजांचे दर्शन घडावे अशाच ठिकाणी दोन्ही प्रतिकृती स्थापित केल्या आहेत.’’

मराठा स्मृतीस्थळ येथे ही महाराजांची मूर्ती :

मच्छल बटालियनच्या वतीने शिवरायांची एक मूर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मूर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या ‘मराठा स्मृतिस्थळ’ येथे बसविण्यात आली आहे. हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा बटालियनच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे. या समृतीस्थळात एक भिंत उभारण्यात आली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३२ जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामुळे देशासाठी बलीदान देणाऱ्या वीर जवानांचा इतिहास कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत राहील, असेही कर्नल पवार यांनी सांगितले.

‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मूर्ती साकारण्याचे काम करत आहे. या कलेचा वारसा वडिलांकडूनच मिळाला. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांसाठी हे कार्य करताना अत्यंत अभिमान वाटला. प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायबरचा वापर करण्यात आले आहे. त्यामुळे ऊन, पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यावरही मूर्तीवर काही परिणाम होत नाही.

- अजिंक्य लोहगावकर, मूर्तिकार

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मूर्तीबाबत :

- सुमारे पाच फूट उंच

- पुण्यातील एसएसपीएमएसच्या आवारात असलेल्या महाराजांच्या मूर्तीची हुबेहुब प्रतिकृती

- फायबरमध्ये असलेली मूर्ती २५ किलोग्रॅम वजनाची

- प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मूर्ती टिकून राहील

- कोणत्याही ठिकाणी मूर्तीला घेऊन जाणे शक्य

मराठा स्मृतीस्थळाबाबत :

- शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकात्मक स्वरुपात मराठा स्मृतीस्थळ

- येथे असलेली महाराजांची मूर्ती सुमारे १२ फूट उंच

- हुतात्म्यांच्या सन्माणार्थ स्मृतीस्थळ येथे विशेष भिंत

- एकूण ३२ हुतात्मा जवानांची नावे भिंतीवर

- नौदलाची प्रतिमा दर्शविण्यासाठी कृत्रिम बेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com