
पत्नीने पतीला पालकांपासून विभक्त करणं ही क्रूरता : हायकोर्ट
नवी दिल्ली : जर पत्नी सतत पतीला त्याच्या कुटुंबापासून विभक्त होण्यासाठी आणि आई-वडिलांपासून दूर राहण्यासाठी भाग पाडत असेल तर ही मानसिक क्रूरता आहे, असं महत्वपूर्ण निरीक्षण छत्तीसगड उच्च न्यायालयाने (Chhattisgarh High Court) नोंदवलं आहे. तसेच हुंड्यासाठी खोट्या प्रकरणात अडकवणे हे देखील मानसिक क्रूरतेचं लक्षण आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
हेही वाचा: मशिदीत लाऊडस्पीकर वापरणे मूलभूत अधिकार नाही : High Court
क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट देण्याची याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली होती. कौटुंबिक न्यायालयाने २१ फेब्रुवारी २०१७ ला दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायाधीश गौतम भादुरी आणि एनके चंद्रवंशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. न्यायाधीशांनी म्हटले की, रेकॉर्डवरील पुराव्यांनुसार दोघांमध्ये मतभेद निर्माण होण्यापूर्वी हे जोडपे जवळजवळ दोन महिने एकत्र राहिले. या दोन महिन्यात देखील पत्नी वारंवार तिच्या माहेर जात होती. पत्नीच्या वडिलांनी देखील जावयाला आई-वडिलांचे घर सोडण्यास सांगितले. पतीने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. पतीपेक्षा पत्नीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे तिला त्याच्या आई-वडिलांसोबत राहायचे नाही. ती नेहमीच मानसिक दबाव निर्माण करत होती. या संदर्भात त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना हुंड्यांच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देखील दिली आहे, असं न्यायाधीशांनी म्हटलं.
मध्यमवर्गीय कुटुंबात आई-वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी ज्येष्ठ मुलाची असते. तसं विधान देखील याचिकाकर्त्याच्या पतीनं केलं आहे. अशा परिस्थितीत पत्नी पतीला कुटुंबापासून विभक्त होण्यासाठी दबावा निर्माण करत असेल आणि हुंड्यासाठी खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असेल तर मानसिक क्रौर्य आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मानसिक क्रूरतेचे कारण देत घटस्फोट खंडपीठाने मंजूर केला आहे.
Web Title: Chhattisgarh High Court Observed Wife Wife Constraining Husband To Get Separated From Parents Is Cruelty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..