'ज्या' सीबीआय कार्यालयाचे उद्घाटन केले त्याच कार्यालयात अटकेत

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

रात्रभर चिदंबरम यांचा मुक्काम या कार्यालयातच होता. सीबीआयने अटक करून सीबीआयच्या ज्या इमारतीत आणण्यात आले. त्या इमारतीच्या उद्घाटनाला चिदंबरम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सीबीआयच्या या नव्या इमारतीचे उद्घाटन 2011 मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी चिदंबरम गृहमंत्री होते. आता त्याच कार्यालयात त्यांना अटक करून ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी अटकपूर्व जामिनाचे सर्व पर्याय संपुष्टात आल्यानंतर तब्बल तीस तासांनी चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक करण्यात आली आणि त्यांनी सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात आले. याविषयी योगायोग असा की आठ वर्षांपूर्वी ज्या सीबीआय कार्यालयाचे चिदंबरम यांनी उद्धाटन केले होते, आता त्याच कार्यालयात त्यांना ठेवण्यात आले आहे.

बुधवारी रात्री अचानक काँग्रेस मुख्यालयात चिदंबरम अवतरले. तेथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी रवाना झाले; सीबीआयच्या पथकाने पाठलाग करत त्यांचे घर गाठले अन् पावणेदहाच्या सुमारास त्यांना अटक केली. चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी या वेळी अक्षरशः इमारतीच्या कंपाउंडवरून उड्या घेत आत प्रवेश केला. याचवेळी अधिकाऱ्यांचे दुसरे पथक हे मागील दाराने आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल ९५ मिनिटांच्या नाट्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. तेथून पुढे चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयामध्ये आणण्यात आले.

रात्रभर चिदंबरम यांचा मुक्काम या कार्यालयातच होता. सीबीआयने अटक करून सीबीआयच्या ज्या इमारतीत आणण्यात आले. त्या इमारतीच्या उद्घाटनाला चिदंबरम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सीबीआयच्या या नव्या इमारतीचे उद्घाटन 2011 मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी चिदंबरम गृहमंत्री होते. आता त्याच कार्यालयात त्यांना अटक करून ठेवण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chidambaram arrived at inauguration of CBI headquarters 8 years ago