
CM Nitish Kumar : मोदींच्या बैठकांना न जाणे वेगळे नाही; मुख्यमंत्री नितीश कुमार
पाटणा : बिहारमध्ये युती मोडून भाजपला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकांकडेही अनेकदा पाठ फिरविली आहे, मात्र यात नेहमीपेक्षा वेगळे काहीच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय गंगा मंडळाच्या बैठकीचे कोलकत्यात ३० डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. तेजस्वी यांच्याकडे नगरविकास खाते आहे. नमामी गंगे प्रकल्प या खात्याच्या अखत्यारित येतो.
यासंदर्भात नितीश यांनी स्पष्ट केले की, याआधी उत्तर प्रदेशात राष्ट्रीय गंगा मंडळाची बैठक झाली तेव्हा मी नव्हे तर तेव्हाचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे उपस्थित होते. संबंधित खाते तेव्हा त्यांच्याकडेच होते. यावेळी सुद्धा हे खाते ज्यांच्याकडे आहेत ते माझे उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील.
याआधी मोदी यांनी पाच डिसेंबर रोजी जी२० समुहाचे भारताला अध्यक्षपद मिळाल्याबाबत बैठक आयोजित केली होती. सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळावा आणि अध्यक्षपदाचा कार्यकाळ भव्य यशस्वी ठरावा असा त्यांचा उद्देश होता. त्यावेळी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आदी उपस्थित होते.
नितीश यांनी मात्र या बैठकीचे आमंत्रण स्वीकारले नव्हते. याविषयी नऊ डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत मात्र त्यांनी सहभाग नोंदविला होता.केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी पूर्व विभाग मंडळाची बैठक १७ डिसेंबर रोजी कोलकत्यात आयोजित केली होती. त्यावेळी तेजस्वी यांनी बिहारचे प्रतिनिधित्व केले होते.
लालूंच्या चौकशीवरून टोला
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावरील आयआरसीटीसी गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुन्हा चौकशी सुरु केली आहे. यात तेजस्वी यांचाही हात असल्याचा आरोप आहे.
याबाबत विचारले असता नितीश यांनी टोला लगावला. संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि राजद यांची पुन्हा युती झाल्यामुळेच हे घडत असल्याचे लोकांना ठाऊक आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.