Child marriage : बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child marriage rate higher in Jharkhand Report of Demographic Sample Survey

Child marriage : बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

रांची : जादूटोण्याच्या संशयावरून झालेल्या हत्येच्या घटनांमुळे देशभर कुख्यात असलेल्या झारखंडला आणखी डाग लागला असून याच राज्यामध्ये सर्वाधिक बालविवाह होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. गृहमंत्रालयाने केलेल्या लोकसंख्याविषयक नमुना सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. येथे बालवयातच मुलींचा विवाह होण्याचे प्रमाण हे ५.८ टक्के एवढे असल्याचे दिसून आले. केंद्रीय गृहमंत्रालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला.

राष्ट्रीय पातळीवर वयाची अठरा वर्षे पूर्ण करण्याआधीच ज्यांना विवाहाच्या बोहल्यावर चढावे लागते अशा महिलांचे प्रमाण १.९ टक्के एवढे असल्याचे आढळून आले असून केरळमध्ये ते शून्य टक्के तर झारखंडमध्ये ५.८ टक्के एवढे असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. झारखंडमध्ये ग्रामीण भागात बालविवाहांचे प्रमाण ७.३ टक्के एवढे असून नागरी भागामध्ये ते केवळ तीन टक्के असल्याचे दिसून आले. नमुना नोंदणी प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या अहवालामध्ये विविध सांख्यिकी घटकांचा विचार केला जातो. यामध्ये मृत्यूदराचाही अभ्यास केला जातो. हे सर्वेक्षण २०२० मध्ये करण्यात आले होते.

प.बंगालची स्थितीही बिकट

झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये अर्ध्यापेक्षाही अधिक महिलांचे विवाह हे वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच होतात. पश्चिम बंगालमध्ये अशा मुलींचे प्रमाण हे ५४.९ तर झारखंडमध्ये ५४.६ टक्के एवढे आहे.