esakal | Republic Day 2020: जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टरचे होणार दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Chinook and Apache to take part in the flypast for first time

हवाईदलात नव्याने सामील झालेला ‘अपाचे’ आणि ‘चिनूक’ ही हेलिकॉप्टर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा प्रथमच सहभागी होणार आहेत.

Republic Day 2020: जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टरचे होणार दर्शन

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली: हवाईदलात नव्याने सामील झालेला ‘अपाचे’ आणि ‘चिनूक’ ही हेलिकॉप्टर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा प्रथमच सहभागी होणार आहेत; तसेच राफेल लढाऊ विमानाचे प्रतिरूप देखाव्याच्या स्वरूपात सहभागी केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान हवाईदल सामर्थ्य व वैभव दाखवणार असून, यात ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या पाच प्रणालींचे प्रतिरूप ठेवले जाणार आहेत. ज्यात राफेल लढाऊ विमान, स्वदेशी प्रणालीने विकसित करण्यात आलेले कमी वजनाचे ‘तेजस’ लढाऊ विमान, कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच), जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश क्षेपणास्त्र आणि ॲस्ट्रा क्षेपणास्त्र हे आकर्षणाचे केंद्र असणार आहेत; तर फ्लाइट लेफ्टनंट श्रीकांत शर्मा हे सलग दुसऱ्यांदा राजपथावर हवाईदलाच्या तुकडीचे नेतृत्व करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उंचावर चिनूक मोलाचे
‘चिनूक’ हेलिकॉप्टर हे सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी हवाईदलासाठी फायदेशीर ठरणार आहे. बोइंग सीएच-४७ ‘चिनूक’ हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

सुसज्ज ‘अपाचे’
‘अपाचे’ हे क्षेपणास्त्राने सुसज्ज असलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. युद्धकाळात दुर्गम भागात शस्त्रास्त्र आणि अन्य साहित्य पोचवण्यासाठी ‘चिनूक’ हे अत्यंत उपयोगी आहे. ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. सुमारे २८० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारे हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही.

loading image