esakal | काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी; नेतानिवडीच्या बैठकीत दुफळी उघड 
sakal

बोलून बातमी शोधा

congress

बिहार विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत काँग्रेसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत बहुमत मिळाले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी; नेतानिवडीच्या बैठकीत दुफळी उघड 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - विधिमंडळ नेता निवडण्यासाठी बोलाविलेल्या काँग्रेसच्या बैठकीतच नवनिर्वाचित आमदारांच्या समर्थकांनी हाणामारी केल्याची घटना आज घडली. शेवटी गोंधळातच नेता निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि प्रदेश काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांच्यासमोरच हा प्रकार घडला. 

बिहार विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत काँग्रेसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. मात्र या आघाडीतील छोट्या पक्षांना आपल्याकडे वळविण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने नेतानिवडीसाठी आज बैठक बोलावली होती. दुपारी दोन वाजता ही बैठक सुरू होणार होती. या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेल्या अनेकांनी बैठकीपूर्वीच प्रदेश कार्यालयात गर्दी केली होती. आमदार सिद्धार्थ हे आपल्या समर्थकांसह बैठकीला उपस्थित होते. महाराजगंजमधून निवडून आलेले विजय शंकर दुबे बैठकीच्या ठिकाणी पोहोचताच त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू झाली. दुबे यांचे समर्थक आणि आणखी एक नेते वेंकटेश रमण यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर सभागृहाच्या बाहेर असलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. प्रकरण वाढायला लागल्यानंतर इतर नेत्यांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विजय शंकर दुबे आणि सिद्धार्थ हे दोघेही विधिमंडळ नेतेपदासाठी इच्छुक आहेत. दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केल्यानंतर बैठक घेण्यात आली. त्यानंतर दुबे आणि सिद्धार्थ यांच्यासह सर्व आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. आमदारांची मते आता पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगण्यात येणार असून त्यानंतर त्याच विधिमंडळ नेत्याची निवड करणार आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घटनेची माहिती घेऊ 
मुख्यालयात झालेल्या हाणामारीबद्दल बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. अशी कोणतीही घटना घडल्याचे माहित नाही, घटनाची माहिती घेऊ, असे ते झा म्हणाले. तसेच अबिदुर रहाम आणि मनोहर प्रसाद हे दोघे नवनिर्वाचित आमदार आजारी असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते असा खुलासाही झा यांनी केला. 

loading image