
आमचा न्यायव्यवस्थवर विश्वास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली - `न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्हालाच न्याय मिळेल ` अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयीन लढाईबाबत विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व वरिष्ठ भाजप नेत्यांच्या गाठीभेटीसाठी प्रथमच दिल्लीत आलेले शिंदे यांनी थोडक्या शब्दांत ११ जुलैच्या प्रस्तावित न्याायलयीन सुनावणीबाबत व 'शिवसेना नेमकी कोणाची' या बाबतच्या उत्सुकतेवर आपले मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींसाठी आज दिल्लीत दाखल झाले. मध्यरात्री उशीरा ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील असे समजते. रात्री पावणेआठला दोन्ही नेते विमानतळावर उतरले व तेथून सव्वाआठला महाराष्ट्र सदनात आले. दरम्यान विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांनीही आज दिल्ली गाठली. त्यांनी दुपारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. शिंदे व फडणवीस रात्री सदनात आले त्याच सुमारास नार्वेकर हे सदनाबाहेर पडले.महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की न्यायव्यवस्था, कायदे यांचा निर्णय देशात अंतिम असतो. आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणेन्याय मिळेल. आपल्या दौऱयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी `सर्व मुद्यांवर` चर्चा करणार आहोत असेही शिंदे म्हणाले.
शिंदे यांचे गटनेतेपद कायम ठेवणे आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद पदी नियुक्त करणे, तसेच शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या नोटिसांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ जुलै रोजी (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे. त्याबाबतही दोन्ही नेते भाजप हायकमांडबरोबर चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही राजशिष्टाचार भेट घेतील. या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यादरम्यान आता सत्ता वाटपाचा पुढचा अॅक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची यादी व खातेवाटपचा प्लॅन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मंजूर करून घेणे, सोमवारच्या सुनावणीबाबत चर्चा करणे हा या दौऱयातील ठळक कार्यक्रम आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर ते व फडणवीस या दोघांनी एकत्रितपणे पंतप्रधानांनीची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही उद्या (रविवारी) दोन्ही नेते भेट घेतील.
फडणवीस सदनातून बाहेर...
दरम्यान महाराष्ट्र सदनात दोन्ही नेते दाखल झाल्यावर काही मिनिटांतच फडणवीस सदनातून बाहेर पडले. ते फारसे काही न बोलता गाडीत बसून निघून गेले. ते अमित शहांकडे मुख्यमंत्र्यांसह भेटीची वेळ मागण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते. ते नड्डा यांच्याकडे गेले असण्याचीही चर्चा आहे. फडणवीस यांनी आजच्या दौऱयात जाणीवपूर्वक बॅक सीट घेऊन मुख्यमंत्र्यांनाच पुढे केल्याचे दृश्य दिसले. विमानतळापासून महाराष्ट्र सदनापर्यंत फडणवीस यांनी माध्यमांशी न बोलण्याचे धोरण ठेवले. जेव्हा मुख्यमंत्री असातत तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी न बोललेले बरे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली. माध्यमांच्या कॅमेऱयांचा सारा फोकस शिंदे यांच्यावर असताना फडणवीस शांतपणे वाट काढत बाजूला जाऊन थांंबले हे दृश्य सूचक होते.
Web Title: Cm Eknath Shinde Statement We Have Full Faith In Judiciary And Will Get Justice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..