esakal | कोळसा तस्करी : ममता बॅनर्जींच्या कुटुंबीयांची सीबीआयकडून चौकशी; राजकीय वातावरण तापलं
sakal

बोलून बातमी शोधा

Coal smuggling case CBI probe into Mamata Banerjee family The political atmosphere heated up

येत्या मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईची देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोळसा तस्करी : ममता बॅनर्जींच्या कुटुंबीयांची सीबीआयकडून चौकशी; राजकीय वातावरण तापलं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोळसा तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबीयांवर सीबीआयनं केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची त्यांच्या घरी जाऊन सीबीआयच्या टीमने मंगळवारी चौकशी केली. येत्या मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईची देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यापूर्वी सोमवारी रुजिरा बॅनर्जी यांनी सीबीआयच्या समन्सला उत्तर देताना, कथीत कोळसा तस्करी प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय तपास एजन्सीच्या एका टीमला मंगळवारी आपल्या घरी पाठवण्यात यावं असं म्हटलं होतं. त्यानुसार, सीबीआयची टीमने आज त्यांची घरी जाऊन कोळसा तस्करीप्रकरणी चौकशी केली. सीबीआयने रविवारी चौकशीत सहभागी होण्यासाठी रुजिरा यांना समन्स पाठवलं होतं. 

ममतांच्या भेटीनंतर सीबीआय अभिषेक यांच्या घरी दाखल 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (मंगळवारी) अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी भेट दिली. यावेळी तिथे त्या केवळ दहाच मिनिटे थांबल्या. ममता तिथून गेल्यानंतर लगेचच सीबीआयची टीम अभिषेक यांच्या घरी पोहोचली आणि त्यांनी अभिषेक यांच्या पत्नी रुजिरा यांची दीड तास चौकशी केली. 

काय आहे पश्चिम बंगालमधील कोळसा तस्करी प्रकरण

सीबीआयने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कोळसा तस्करीच्या रॅकेटचा कथीत म्होरक्या मांझी ऊर्फ लाला, ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे महाव्यवस्थापक अमितकुमार धर, जयेशचंद्र राय, सुरक्षा प्रमुख तन्मय दास, सुरक्षा निरिक्षक धनजय राय आणि सुरक्षा प्रभारी देबाशीष मुखर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. सीबीआयने आरोप केला आहे की, मांझी ऊर्फ लाला कुनुस्तोरिया आणि काजोर भागातील ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या कोळसा खाणीतून कोळशाचे अवैध खणण करत असून या कोळश्याची तस्करी केली जात आहे.