निधनापूर्वी सुषमांनी हरिश साळवेंना केला होता फोन अन् म्हणाल्या होत्या...

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

आज 8 वाजून 50 मिनिटांनी त्यांच्याशी बोलणं झाले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला या, असेही त्यांनी सांगितले होते. सध्या काय बोलावे हे सुचत नाही.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची एक रुपया फी घेऊन जाण्यासाठी सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी त्यांना फोन केल्याचे समोर आले आहे. आज (बुधवार) साळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते. 

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांनी कलम 370 वरून केलेले ट्विटही व्हायरल होत असताना आता त्यांनी निधनापूर्वी हरीश साळवेंना केलेला फोनही सर्वांना चटका लावून जात आहे. 

स्वराज यांनी निधनाच्या काही मिनिटे आधीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढणारे ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचे ते बोलणे अखेरचे ठरेल याची कल्पनाही नसलेले साळवे ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. आज (बुधवारी) त्यांनी त्यांच्या खटल्याची फी घेऊन जाण्यास सांगितले होते. कुलभूषण जाधव खटल्यात हरीश साळवे यांनी केवळ 1 रूपया फी घेऊन तो खटला लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्वराज यांनी साळवे यांना त्यांची फी देण्यासाठी संपर्क केला होता.

साळवे म्हणाले, की आज 8 वाजून 50 मिनिटांनी त्यांच्याशी बोलणं झाले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला या, असेही त्यांनी सांगितले होते. सध्या काय बोलावे हे सुचत नाही. त्या एक ज्येष्ठ मंत्री होत्या. त्यांच्या निधनाने मी माझी मोठी बहिण गमावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Come and collect your Re 1 fee tomorrow Sushma Swaraj to Harish Salve an hour before her death