कृषी कायद्यांबाबत जागरूकता मोहीम राबवा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 26 September 2020

या कृषी विधेयकाचे फायदे भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांमध्ये मिसळून समजावून द्यावेत आणि राष्ट्रव्यापी जागरूकता मोहीम राबवावी, असेही त्यांनी निर्देश दिले. संघपरिवारातही नाराजी असलेल्या तीन कामगार कायद्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 

नवी दिल्ली - ज्यांनी आतापावेतो शेतकऱ्यांना फक्त खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली तेच आता नव्या कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक शांतता बिघडवत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर केला. या कृषी विधेयकाचे फायदे भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांमध्ये मिसळून समजावून द्यावेत आणि राष्ट्रव्यापी जागरूकता मोहीम राबवावी, असेही त्यांनी निर्देश दिले. संघपरिवारातही नाराजी असलेल्या तीन कामगार कायद्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. भाजप कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना तीन वादग्रस्त कृषी कायद्यांबद्दल अन्नदात्याच्या मनातील ठाम अविश्‍वास-संशय-संताप-भय कायम असल्याची सल मोदींनी पुन्हा बोलून दाखविली. ते म्हणाले, की भाजप कार्यकर्त्यांनी देशात शेतकऱ्यांबरोबर बसून, सातत्याने बोलून सरळ भाषेत त्यांना नव्या कृषी कायद्यांचे फायदे पटवून दिले पाहिजे. याचा लाभ अतिशय छोट्या शेतकऱ्यांना मिळेल. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्याला कर्ज काढण्यास भाग पाडणारी व्यवस्था बदलल्याचेही त्यांना सांगितले . कृषी कायद्यांच्या निमित्ताने ज्यांनी सातत्याने खोटेपणा केला तेच आता शेतकऱ्यांमध्ये भ्रम व अनाठायी भीती निर्माण करत आहेत, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल अफवा पसरवत आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके शेतकरी व कामगारांच्या नावाने नुसत्या घोषणा दिल्या जायच्या, मोठमोठे जाहीरनामे निघायचे. पण ते सारे किती पोकळ होते हे काळानेच दाखवून दिले आहे. या लोकांमुळेच समाजात अव्यवस्था व अनाचार, अभाव व असमानता, असुरक्षा व असमाजिकता वाढत गेली, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी म्हणाले: 
- भाजप सरकारनेच शेतकऱ्यांना खर्चाच्या दीड पट एमएसपीची हमी व सरकारी खरेदीही सुनिश्‍चित केली. 
-पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीद्वारे १० कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांत १ लाख कोटींहून जास्त रक्कम जमा 
- राष्ट्रीय शिक्षण धोरणावर ठिकठिकाणी ५ किंवा ७ दिवसांचे मेळावे घेऊन तज्ञांकडून याबाबतच्या सूचना मागवाव्यात 
- आमचा मंत्र स्पष्ट आहे व आमच्यासाठी राष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे. 
- शेतकरी, कामगार, महिला, गरीब वर्ग हे सारेच आत्मनिर्भर भारताचे मजबूत स्तंभ आहेत. त्यांचा आत्मसन्मान व आत्मगौरवच आत्मनिर्भर भारताची प्राणशक्ती आहे. 

- ठेकेदारीवरील मजुरीऐवजी विशिष्ट कालावधीसाठी निश्‍चित रोजगार मिळण्याचा पर्याय कामगार कायद्यांमुळे खुला झाला आहे. 
- बांधकाम, शेती, पत्रकारिता, चित्रपट क्षेत्र, उद्योग यातील कामगारांसाठी वेगवेगळे याआधी कायदे होते. फक्त किमान मजुरीबाबत तब्बल १० हजार कायद्यांचे जंजाळ निर्माण करून ठेवण्यात आले होते. अनेक प्रयत्नांनंतर आता त्यांची संख्या २०० वर आणली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conduct awareness campaigns on agricultural laws Narendra Modi appeal to BJP activist