'योगीराज'मध्ये मागील दोन वर्षांत 20 साधुंची हत्या, काँग्रेसचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

भूमाफिया आणि सत्ताधाऱ्यांमधील युतीने उत्तर प्रदेश गुन्हेगारांच्या हवाली झाले आहे.  मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता हरवली आहे. या तथाकथित रामराज्यात कोणीच सुरक्षित नाही. 

लखनौ- गोंडा येथे पुजारीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरुन राजकारणाला वेग आला आहे. यामुळे योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. पुजारीवरील हल्ल्यामागे सरकार आणि भूमाफिया यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर समाजवादी पक्षाच्या मते, उत्तर प्रदेशात सातत्याने पुजाऱ्यांवर निशाणा साधला जात असला तरी सरकारचे मौन कायम असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने तर मागील दोन वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये साधु-संतांवर 20 हल्ले झाल्याचे सांगत कागदपत्रेच दाखवले. काही हत्यांना आत्महत्या असल्याचे सांगत पोलिसांनी हे प्रकरण दाबूनही टाकल्याचा त्यांनी आरोप केला आहे. 

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय लल्लू यांनी याप्रकरणी टि्वट केले आहे. त्यांनी म्हटले की, गोंडामध्ये रामजानकी मंदिराचे पुजारी सम्राट दास यांच्यावर भूमाफियांनी गोळ्या झाडल्या. भूमाफिया आणि सत्ताधाऱ्यांमधील युतीने उत्तर प्रदेश गुन्हेगारांच्या हवाली झाले आहे. सरकारचे याबाबत काहीच उत्तरदायित्व नाही का?. मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता हरवली आहे. या तथाकथित रामराज्यात कोणीच सुरक्षित नाही. 

उत्तर प्रदेश काँग्रेसने मागील काही दिवसां साधु-संतांवर झालेल्या हल्ल्याचा नकाशा जारी करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. यूपीत मागील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक साधुंच्या हत्या होत आहेत. काही हत्यांना पोलिसांनी आत्महत्येचे रुप दिले आहे, असे या टि्वटमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी साधु-संतांवर झालेल्या हल्ल्यावरुन प्रश्न विचारले आहेत. त्यांनी याबाबत टि्वट केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Up Congress ajay lallu Slams Yogi Aditynath Over Attack On Gonda Priest