BJP vs Congress : भाजपविरुद्ध काँग्रेसचे आरोपपत्राचे ‘शस्त्र’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP vs Congress

BJP vs Congress : भाजपविरुद्ध काँग्रेसचे आरोपपत्राचे ‘शस्त्र’

नवी दिल्ली : गुजरातमध्ये ३०० युनिट वीज मोफत, ५०० रुपयात एलपीजी सिलिंडर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगार भत्ता यासारख्या ११ कलमी आश्वासनांमधून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. तसेच अमली पदार्थांची तस्करी, पाच लाख रिक्त सरकारी पदे, मोरबी दुर्घटना यासारख्या विषयांवर भाजपविरोधात चार आरोपपत्र काँग्रेसतर्फे प्रकाशित केले जाणार आहेत.

दरम्यान, कॉंग्रेसने गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचे ठाम दावे करताना ‘आम आदमी पक्ष’ आणि एमआयएम हे पक्ष भाजपची बी टीम असल्याचा हल्ला चढवला आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या आश्वासनांचा आठ कलमी अजेंडा ट्विट केला.

कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये पवन खेडा यांनी यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे यासारख्या आश्वासनांचा उल्लेख करून हा अकरा कलमी सकारात्मक अजेंडा असल्याचा दावा केला. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारासाठी दिग्विजय सिंह, अशोक गहलोत, कमलनाथ, पी. चिदंबरम हे नेते जाणार असल्याचे खेडा यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा

गुजरातमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ते सात जागांची मागणी केली आहे तर तीन जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी सुरू असल्याचे समजते. काँग्रेस नेते रघू शर्मा यांनी आघाडीच्या चर्चेला दुजोरा दिला. दोन्ही पक्षांची बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

गुजरातसाठी खर्गे यांचा अजेंडा

  • ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर

  • ३०० युनिटपर्यंत मोफत वीज

  • १० लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार

  • शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी

  • सरकारी नोकरीत कंत्राटी पद्धत बंद करून ३०० रुपये महागाई भत्ता

  • तीन हजार सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडणे

  • कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्या तीन लाख जणांच्या कुटुंबांना

  • ४ लाखाची भरपाई देणे