esakal | काँग्रेस आक्रमक; ट्विटरकडे पत्र पाठवून 11 मंत्र्यांवर कारवाईची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

वादग्रस्त ‘टूलकिट’ प्रकरणावरून सत्ताधारी भाजपशी सुरू असलेला काँग्रेसचा राजकीय संघर्ष आता ट्विटरच्या दरबारात पोहोचला आहे

काँग्रेस आक्रमक; ट्विटरकडे पत्र पाठवून 11 मंत्र्यांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- वादग्रस्त ‘टूलकिट’ प्रकरणावरून सत्ताधारी भाजपशी सुरू असलेला काँग्रेसचा राजकीय संघर्ष आता ट्विटरच्या दरबारात पोहोचला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रांप्रमाणेच ११ केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटर खात्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसने ट्विटरकडे पत्राद्वारे केली. तर, दिल्ली पोलिसांनी ट्विटरच्या कार्यालयात जाऊन बजावलेली नोटीस आणि दोन काँग्रेस नेत्यांना तपासासाठी बोलावल्यानंतर राहुल गांधींनी प्रथमच या प्रकरणावर भाष्य करताना ‘सत्य घाबरत नाही’ असे म्हटले आहे. (Congress asks Twitter to put manipulated media tag on toolkit posts of 11 Union ministers)

कोरोनाच्या निमित्ताने काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बदनामीची मोहीम राबविण्यासाठी ‘टूलकिट’ तयार केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता. काँग्रेसने हा आरोप फेटाळताना पात्रा यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री स्मृती इराणी, सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी ट्विटर कंपनीकडे केलेल्या तक्रारीनंतर, संबित पात्रा यांचे ट्विटर खाते संशयास्पद माहिती असलेले (मॅनिप्युलेटेड मीडिया) असल्याचा शेरा ट्विटरने मारला. या कृतीनंतर केंद्र सरकार नाराज असून दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी नोटीस बजावून, ‘असा शेरा मारण्याला आधार काय’ अशी विचारणा केली. त्यानंतर, सोमवारी ट्विटरच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयांवर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने प्रत्यक्ष जात नोटीसही बजावली. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीसही पाठविली असल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने या कारवाईवर टिकास्त्र सोडले आहे. सोबतच, टूलकिट प्रकरणात ट्विटरला पत्र पाठवून ११ केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटर खात्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली.

हेही वाचा: पुणे पोलिसांची साथ देणारा ३ पायांचा श्वान पाहिलात? जॉन अब्राहमनेही दिली दाद

या नेत्यांवर कारवाईची मागणी

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटर इंडियाकडे पत्राद्वारे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, गिरीराज सिंह, स्मृती इराणी, रवीशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, रमेश पोखरियाल निशंक, थावरचंद गेहलोत, डॉ. हर्षवर्धन, मुख्तार अब्बास नक्वी आणि गजेंद्रसिंह शेखावत यांच्या ट्विटर खात्यांवर कारवाईची मागणी केली आहे. खोट्या माहितीच्या प्रसारासाठी ट्विटरचा गैरवापर केल्याबद्दल तसेच माहितीच्या सत्यतेविषयी शंका असलेल्या खात्यांविरोधात ज्याप्रकारे कारवाई केली जाते, तोच निकष या मंत्र्यांच्या ट्विटर खात्यांना लावावा, अशीही मागणी सुरजेवाला यांनी या पत्रात केली.