काँग्रेसचे पुनरागमनाचे प्रयत्न; मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली तीन समित्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 November 2020

काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर पत्र लिहून सवाल उपस्थित करणाऱ्या २३ नेत्यांच्या जी-२३ गटातील गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - राजकीय पिछेहाट होणाऱ्या काँग्रेसच्या संरक्षणविषय, परराष्ट्र व्यवहार विषयक आणि आर्थिक धोरणाला दिशा देण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन समित्यांची नियुक्ती केली आहे. आर्थिक, सुरक्षा विषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका योग्यपद्धतीने मांडली जात नाही आणि त्यासाठी अनुभवी नेत्यांची मते विचारातही घेतली जात नसल्याचा आक्षेप वाढल्यानंतर या समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने नाराज ज्येष्ठ नेत्यांना समितीत स्थान देऊन चुचकारण्याचाही प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने केल्याचे मानले जात आहे. 

काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर पत्र लिहून सवाल उपस्थित करणाऱ्या २३ नेत्यांच्या जी-२३ गटातील गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र या गटातले मनीष तिवारी, बिहार निवडणुकीच्या निकालानंतर नव्या वादाला तोंड फोडणारे कपिल सिब्बल यांना मात्र दूर ठेवण्यात आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या समित्यांची घोषणा केली. आर्थिक व्यवहार समितीमध्ये डॉ. मनमोहनसिंह यांच्यासोबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजयसिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. तर जयराम रमेश या समितीचे समन्वयक असतील. परराष्ट्र व्यवहार विषयक समितीचे समन्वयक माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद असतील. या समितीत आनंद शर्मा, शशी थरूर आणि सप्तगिरी उलका यांना स्थान देण्यात आले आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा विषयक समितीचे समन्वयक म्हणून विन्सेन्ट एच. पाला यांना नेमण्यात आले आहे. या समितीमध्येही डॉ. मनमोहन यांच्या व्यतिरिक्त राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, व्ही. वैथीलिंगम यांचा समावेश आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यातील शशी थरूर यांनी तर, राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायचे नसेल तर नव्या अध्यक्षांची लवकर नियुक्ती करून निर्नायकी अवस्था संपवावी असा पक्षाला सल्ला दिला होता. तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे देखील उघडपणे पराभवाच्या कारणांच्या विश्लेषणासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनाही समित्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. तर महत्त्वाच्या समित्यांमध्ये संघटना सरचिटणीस आणि माध्यम विभाग प्रमुखांना स्थान देण्याची प्रथा यावेळी बाजूला ठेवण्यात आली आहे. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि माध्यम विभाग प्रमुख व सरचिटणीस रणदीप सुरजेवाला या दोघांना समित्यांमध्ये न झालेला समावेश पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे. 

जी२३ गटही सहभागी 
पक्ष संघटनेतील विस्कळीतपणा आणि नेतृत्वाचे दुर्लक्ष यामुद्द्यावर ऑगस्टमध्ये सोनिया गांधींना पत्र लिहून राहुल गांधींच्या कार्यशैलीवर नाराजी जगजाहीर करणाऱ्या २३ नेत्यांविरुद्ध राहुल समर्थक तरुण नेत्यांची फळी सरसावली. कार्यकारिणी बैठकीमध्ये या वरिष्ठ मंडळींना आक्रमकपणे लक्ष्य करण्यात आले. यामुळे पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली. तर नाराज जी-२३ समूहाचा प्रमुख चेहरा असलेल्या गुलाम नबी आझाद यांना संघटनात्मक फेरबदलामध्ये सरचिटणीसपदावरून डच्चू देऊन केवळ कार्यकारिणीपुरता मर्यादित ठेवण्यात आले होते. तर आनंद शर्मा यांचेही पंख छाटण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress attempted comeback Three committees headed by Manmohan Singh