अटींवरच आघाडीचे राजकारण... काँग्रेसचा शिबिरातून संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress chintan shibir congress party to hold chintan shivir in udaipur rahul gandhi sonia gandhi Election of 2024
अटींवरच आघाडीचे राजकारण... काँग्रेसचा शिबिरातून संदेश

अटींवरच आघाडीचे राजकारण... काँग्रेसचा शिबिरातून संदेश

नवी दिल्ली : आघाडीचे राजकारण हवे परंतु आपल्या अटी शर्तींवर, असा स्पष्ट संदेश चिंतन शिबिरातून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस बळकट झाली तर तर विरोधकांची आघाडी बळकट होईल. काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा परिणाम विरोधी ऐक्यावर होईल, असा स्पष्ट इशारा या शिबिराच्या निमित्ताने देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, असे सूत्रांनी सांगितले.

उदयपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात संघटना बांधणी, आघाडीचे राजकारण या राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अर्थात, आघाडीचा थेट निर्णय होणार नसला तरी आघाडीसाठीचा व्यापक संदेश समविचारी विरोधी पक्षांना दिला जाईल, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. १९९८ मध्ये मध्यप्रदेशातील पंचमढी येथे झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने आघाडीचे राजकारण न करता ‘एकला चलो रे’ चा नारा दिला होता.

आघाडीचे राजकारण फार काळ चालणार नाही, असे म्हणणाऱ्या काँग्रेसने २००३ मध्ये सिमला येथे झालेल्या चिंतन शिबिरात आघाडीच्या राजकारणाची साद घातली होती आणि त्यातून यूपीए अस्तित्वात आली. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर काँग्रेसने पुन्हा आघाडीच्या राजकारणाची कास धरण्याचे ठरविले आहे. मात्र, अलीकडच्या काळात तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षासारख्या पक्षांकडून विरोधकांच्या नेतृत्वासाठी मिळणारे आव्हान पाहता आपल्या अटी शर्तींवर ठाम राहूनच विरोधी पक्षांना सोबत घ्यावे यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे.

पक्षाच्या सूत्रांनी सांगितले, की काँग्रेस पक्ष दुबळा राहिला तर विरोधकांची आघाडी प्रभावी ठरणार नाही. त्यामुळे काँग्रेस मजबूत झाल्यास विरोधी पक्षांची आघाडी मजबूत होऊन येत्या निवडणुकीत भाजपला आव्हान देता येईल, असा स्पष्ट संदेश चिंतन शिबिरातून दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तसेच शिवसेनेनेही काँग्रेसला वगळून विरोधकांची प्रभावी आघाडी शक्य नसल्याचे म्हटले आहे, त्याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत.

आमूलाग्र बदलावरही मंथन

काँग्रेस संघटनेमध्ये कालबद्धरित्या आमूलाग्र बदलावरही चिंतन शिबिरात मंथन होणार आहे. निवडणूक काळात जनतेशी संपर्कासाठी प्रचार मोहीम राबविणे असले तरी उर्वरित काळातही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने प्रचार मोहीम राबविली जावी यासाठीही काँग्रेस चिंतन शिबिरात तयार करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रियांका गांधी, दिग्विजयसिंह यासारख्या नेत्यांनी याबाबतच्या सूचना केल्या होत्या, असेही सूत्रांनी सांगितले. हे चिंतन शिबिर प्रामुख्याने २०२४ची लोकसभा निवडणूक केंद्रस्थानी मानूनच होणार असल्याने या निर्णयांची अंमलबजावणी लवकर होईल असाही दावा या सूत्रांनी केला. मात्र, संघटनेतील बदलासाठीच्या ‘एका कुटुंबात एकच उमेदवारी’ यासारख्या सूचनांबाबत या सूत्रांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.

उदयपुरात आजपासून चिंतन शिबिर

उदयपूर येथे उद्यापासून (ता. १३) काँग्रेसच्या बहुचर्चित चिंतन शिबिराला प्रारंभ सुरवात होणार आहे. निवडणुकांमधील सततचा पराभव, नेतेमंडळींचे पलायन आणि अंतकर्लहामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाढलेली निराशा या अडचणींशी झगडणारा काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवनाचा संकल्प या चिंतन शिबिराच्या निमित्ताने घेणार आहे.

सध्या लोकशाही, आर्थिक आणि सामाजिक संक्रमणाच्या काळातून देश जात असताना काँग्रेस पक्ष चिंतन शिबिरात १३, १४ आणि १५ मेस आत्मचिंतन, आत्ममंथन आणि आत्मावलोकन करेल, अशी टिप्पणी काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना केली. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी पक्ष पुनरुज्जीवनासाठी ‘जादूची छडी’ नाही अशी भावना व्यक्त करताना, नेत्यांनी आता पक्षाचे कर्ज चुकवावे, अशी भावनिक सादही घातली होती. त्यापार्श्वभूमीवर उदयपूरच्या आलिशान ताज अरावली हॉटेलमध्ये होणाऱ्या या चिंतन शिबिरात काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य, कायम निमंत्रित आणि विशेष सदस्य, सर्व प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विधान परिषदांमधील गटनेते,माजी केंद्रीय मंत्री, सर्व खासदार असे ४३० जण सहभागी होणार आहेत.

या शिबिरात राजकीय स्थिती त्याचप्रमाणे काँग्रेस संघटनेतील संभाव्य बदल यावर मंथन अपेक्षित आहे. त्यासोबतच आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, तरुणाईवरही चर्चा केली जाणार आहे. यातून संमत होणारे ठरावांवर कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब होऊन उदयपूर संकल्प स्वीकारला जाईल.

Web Title: Congress Chintan Shibir Congress Party To Hold Chintan Shivir In Udaipur Rahul Gandhi Sonia Gandhi Election Of 2024

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top